Shailaja Darade : शैलजा दराडे यांचा जामीन अर्ज फेटाळला

शिक्षण विभागात (Education Department) नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दराडे यांच्यावर आहे.

Shailaja Darade : शैलजा दराडे यांचा जामीन अर्ज फेटाळला
Shailaja Darade

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांचा जामीन लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी मंगळवारी फेटाळला. आर्थिक फसवणूक प्रकरणात हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दराडे यांना सात ऑगस्ट रोजी अटक केली आङे.

शिक्षण विभागात (Education Department) नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दराडे यांच्यावर आहे. पोपट सुखदेव सूर्यवंशी (वय ५०, रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांच्या फिर्यादीवरून दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

परीक्षा विभागातील लुटारूंच्या मुसक्या कोण आवळणार ?

शैलजा दराडे यांना अटक केल्यानंतर त्यांना सुरूवातीला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी जोरदार विरोध केला. दराडे यांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून जामीन मिळाल्यास तपासात अडचणी येतील, असा युक्तीवाद नवगिरे यांनी केला. त्यावर न्यायालयाने दराडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि प्राथमिक शिक्षण संघाच्या विविध पदांवर पदाधिकारी आहे. त्यांना व इतर शिक्षकांना आरोपी दादासाहेब दराडे याने २०१९ मध्ये सांगितले की, त्याची बहिण शैलजा दराडे प्रशासकीय अधिकारी असून शिक्षक भरती, बदली, तलाठी आणि टीईटी परिक्षा पास करणे अशी कामे करते. त्याच्या सांगण्यानूसार फिर्यादी आणि काही शिक्षकांनी शैलजा दराडे यांची पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगमधील कार्यालयात भेट घेतली होती.

त्यांनी डी.एड. पदावर शिक्षक म्हणून बारा लाख, बी.एड. पदावर शिक्षक म्हणून १५  लाख, तलाठी म्हणून १२ लाख आणि टीईटी परीक्षा पास करण्यासाठी चार लाख रुपये दर सांगितला. रक्कम रोख स्वरुपात स्विकारली जाईल, मात्र माझे नाव कोठेही सांगायचे नाही, असे सांगितले होते. त्यानूसार फिर्यादी आणि त्याच्या दोन नातेवाईकांनी २७  लाख रुपये दादासाहेब दराडेला हडपसर येथे दिले होते. मात्र फसवणूक झाल्यावर फिर्यादीने तक्रार दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo