स्कूल बसेसची वारंवार तपासणी करा ; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे निर्देश 

शाळा, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे  पालन करावे,

स्कूल बसेसची वारंवार तपासणी करा ; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे निर्देश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय विद्यार्थी वाहतूक (School Student Transportation) हा अतिशय संवेदनशील विषय आहे.स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय (Coordination between schools, transport department, police department) असावा.वारंवार स्कूल बसेसची तपासणी करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे (school bus manual) काटेकोरपणे  पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Commissioner of Police Ritesh Kumar) यांनी दिले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, बारामतीचे  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी  उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कुमार म्हणाले, घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीत अपघात किंवा इतर प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.  

हेही वाचा : Winter Session Nagpur : दोन विद्यार्थ्यांची मानसिक तणावातून आत्महत्या ! शाळेच्या वेळा बदलण्याचा मुद्दा पुन्हा तापला

बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही रितेश कुमार म्हणाले.

मगर म्हणाले, विद्यार्थी शाळेचा महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी शाळेने घ्यावी. वाहतूक संदर्भात शाळेचे ऑडिट करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांनी, वाहतूकदारांनी संवेदशीलतेने चुका होऊ देवू नये.विनापरवानगी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास परिवहन विभाग तसेच पोलीसांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे. 

आदे म्हणाले, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा शाळेबरोबर सामंजस्य करार करणे शाळांची जबाबदारी आहे. या वाहनांचे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे व वाहनाच्या रचनेत स्कूल बस नियमावलीनुसार आवश्यक त्या सुधारणा केलेल्या असणे आवश्यक आहे.