देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ : सुमारे दोन कोटी विद्यार्थिनी घेत आहेत शिक्षण 

उच्च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३.४२ कोटी इतकी होती, ती आता  ४.३२  कोटी इतकी झाली आहे.

देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ : सुमारे दोन कोटी विद्यार्थिनी घेत आहेत शिक्षण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण क्षेत्रातून एक समाधानकारक बातमी समोर येत आहे, उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत (Increase in the number of Indian students pursuing higher education) सुमारे ९० लाख विद्यार्थ्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी उच्च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३.४२ कोटी इतकी होती, ती आता  ४.३२  कोटी इतकी झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालातुन (Reports of the Union Ministry of Education)ही माहिती समोर आली आहे.  या अहवालानुसार, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे दोन कोटी विद्यार्थिनींचा समावेश आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची एकूण नोंदणी ३.४२  कोटी होती. २०२१-२२ च्या सर्वेक्षणानुसार, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची एकूण नोंदणी ४.३२ कोटी झाली. धमेद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार चालू शैक्षणिक वर्षात ही संख्या आणखी जास्त असू शकते. उच्च शिक्षणात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली असताना, शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.सध्या देशात 1 हजार 113 विद्यापीठे आणि 43 हजार 796 महाविद्यालये आहेत.

प्रधान म्हणाले की ,वर्ष  २०१४ च्या तुलनेत आज ३१.६ टक्के जास्त मुली शिक्षण घेत आहेत. हा अहवाल उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पूर्वीच्या अहवालाच्या तुलनेत मुलींची लक्षणीय वाढ झाल्याचे दर्शवितो. परंतु अद्याप नोंदणीचे लक्ष्य गाठणे बाकी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा (NEP 2020) मध्ये, 2035 पर्यंत उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची एकूण नोंदणी (GER) 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अहवालानुसार, उच्च शिक्षणात सर्वाधिक नोंदणी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये झाली आहे.

महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय, बी.टेक, एमबीबीएससह इतर प्रकारचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ७९ टक्के विद्यार्थी पदवीपूर्व स्तराचे आहेत. तर  सुमारे 12 टक्के पदव्युत्तर  तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानशाखेत शिक्षण घेणारे विद्यार्थी  ११.९ टक्के आहेत.

 प्रधान म्हणाले , महाविद्यालये आणि विद्यापीठांची संख्या देखील सतत वाढत आहे. प्राप्त अहवालात असे दिसून आले आहे की 2019-20 या वर्षाच्या तुलनेत उच्च शैक्षणिक संस्थांच्या संसाधनांमध्ये वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये केवळ 86 टक्के उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये संगणक केंद्रे होती, तर 2020-21 मध्ये 91 टक्के उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये संगणक केंद्रे होती. 2019-20 मध्ये केवळ 58 टक्के उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कौशल्य केंद्रे होती. 2020-21 मध्ये, 61 टक्के संस्थांमध्ये कौशल्य केंद्रे होती.