PG Medical : सहाय्यक शल्यचिकित्सक पदाच्या भरतीत डॉक्टरांना मिळणार प्रोत्साहनपर गुण; न्यायालयाचा आदेश

पीजी विद्यार्थ्यांनी दिलेली सेवा हा प्रशिक्षणाचा भाग असल्याचा दावा सरकारने केला होता. त्यामुळे त्यांना इतर पूर्णवेळ डॉक्टरांप्रमाणे प्रोत्साहनपर गुण देता येणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले होते.

PG Medical : सहाय्यक शल्यचिकित्सक पदाच्या भरतीत डॉक्टरांना मिळणार प्रोत्साहनपर गुण; न्यायालयाचा आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोविड (Covid 19) काळात आपल्या जीवाची पर्वा न करता शासकीय रुग्णालयांमध्ये (Government Hospitals) कोविड ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर (PG Medical) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना सहाय्यक शल्यचिकित्सक पदाच्या भरती प्रक्रियेत प्रोत्साहनपर गुण देण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) मुख्य न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या पहिल्या खंडपीठाने दिला आहे. 

 

डॉ. डी हरिहरन आणि इतर तीन डॉक्टरांनी दाखल केलेल्या याचिकेला अंशतः परवानगी देताना मद्रास उच्च न्यायालयाने  हा निकाल दिला आहे. तमिळनाडू सरकारचा दि. १७ ऑगस्ट २०२३ चा सरकारी आदेश कायम ठेवत, नियमित  सरकारी नियुक्त्यांमध्ये कोविड-१९ संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांना उत्तेजनार्थ गुण मंजूर करून, खंडपीठाने डॉ. टी. अजय आणि इतर २६ डॉक्टरांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. या निर्णयाला आव्हान देणारी  याचिका डॉ. डी हरिहरन आणि इतर तीन डॉक्टरांनी दाखल केली होती. 

येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची; विषय निवडण्याचेही स्वातंत्र्य

 

पीजी विद्यार्थ्यांनी दिलेली सेवा हा प्रशिक्षणाचा भाग असल्याचा दावा सरकारने केला होता. त्यामुळे त्यांना इतर पूर्णवेळ डॉक्टरांप्रमाणे प्रोत्साहनपर गुण देता येणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले होते. यावर सुनावणीनंतर निकाल देताना  न्यायालयाने म्हटले की, हे खरे आहे की पीजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सेवा या ३६ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा भाग होत्या. हा कालावधी ते ज्या विषयाचा अभ्यास करतात त्यासाठीचे व्यावहारिक प्रशिक्षण मानले जात असे.

 

साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या विलक्षण परिस्थितीमुळे, त्यांना सरकारी रुग्णालयातील संबंधित वॉर्डांमध्ये कोविड-१९ कर्तव्यासाठी देखील नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी समान कर्तव्ये पार पाडली आणि राज्य सरकारने भरती केलेल्या इतर वैद्यकीय अधिकार्‍यांप्रमाणेच या विद्यार्थ्यांनीही परिश्रमपूर्वक त्यांची ड्युटी पार पाडली. तथापि, याचिकाकर्ते आणि इतर अर्जदार, ज्यांनी कोविड-१९ कर्तव्ये पार पाडली आहेत, त्यांचा देखील प्रोत्साहनपर गुण देण्याच्या उद्देशाने “वैद्यकीय अधिकारी” म्हणून विचार केला जावा, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात  म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO