पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर 

पुण्यातून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर, प्राध्यापक डॉ.संजय ढोले, बायोटेक्नोलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार , डॉ.विलास खरात  यांनी अर्ज केला होता. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) कुलगुरुपदी डॉ. प्रकाश अण्णा महानवर (Vice-Chancellor Dr. On Prakash Mahanwar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती केली.  

डॉ. प्रकाश महानवर जन्म:०१.०६.१९६७  रोजी झाला. सध्या ते मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत.

डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ ५ मे २०२३ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.  त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

पुण्यातून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर, प्राध्यापक डॉ.संजय ढोले, बायोटेक्नोलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार , डॉ.विलास खरात  यांनी अर्ज केला होता.  त्यातील अंतिम पाच उमेदवारांच्या यादीत डॉ. संजय ढोले यांचा समावेश झाला होता.मात्र, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ डॉ. प्रकाश महानवर यांच्या गळ्यात पडली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे  यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु निवड समिती गठीत केली होती. विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. सुरेशकुमार  (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सच‍िव  विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केली .