आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू ; यंदा मराठा आरक्षणाची अंमलबजावणी 

केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा नाही तर कायद्यातील बदलामुळे इतरही शाळा आरटीईच्या कार्यकक्षेत आल्या आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू ; यंदा मराठा आरक्षणाची अंमलबजावणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to Education Act) राबवली जाणारी (आरटीई) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रथमत: शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरटीई प्रक्रियेत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी (Implementation of Maratha Reservation) करण्याबाबत शिक्षण विभागाने शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी (Education Director Sharad Gosavi) यांनी सांगितले. 

काही दिवसांपुर्वी आरटीई कायद्यात बदल करण्यात आल्यामुळे राज्यातील तब्बल 90 हजारांहून अधिक शाळांची नोंदी करावी लागणार आहे. शाळा नोंदणीसाठी येत्या 18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून शाळांची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

राज्यातील लाखो पालक दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. राज्यातील सुमारे 80 ते 90 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. मात्र, यंदा सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर संबंधित शाळेत प्रवेश दिला जाणार नाही,असा बदल राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे एकप्रकारे शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियाच रद्द केली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र,केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा नाही तर कायद्यातील बदलामुळे इतरही शाळा आरटीईच्या कार्यकक्षेत आल्या आहेत. त्यामुळे प्रवेश क्षमतेत वाढ होईल, असा खुलासा शिक्षण विभाग करत आहेत.

शिक्षण विभागाने 2024-25 या शैक्षणिक वर्षांची आरटीई प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू केली आहे. तसेच शाळा नोंदणी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला विलंब होणार आहे. दरवर्षी शिक्षण विभागाकडून विलंब केला जात असल्याने अनेक पालक आपल्या पाल्याचा प्रवेश इतर शाळांमध्ये घेऊन ठेवतात. मार्च महिन्यात नोंदणीला सुरूवात झाल्याने पुढील तीन ते चार महिने ही प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. 
-------------------------------

शासन आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. शाळा नोंदणीनंतर विद्यार्थी नोंदणीला सुरूवात केली जाईल. तोपर्यंत पालकांनी आरटीई प्रवेशास आवश्यक असणारी कागदपत्र काढून ठेवावीत. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी आरटीई प्रवेशासाठी कशी करावी, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे. 
- शरद गोसावी, संचालक प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य