सांगा... किती गुरुजींनी आपले फोटो शाळेत लावले ; शिक्षक संघटना म्हणते एकाही नाही , शासनाने मागवला अहवाल

पण राज्यात एकाही वर्गात शिक्षकाचा फोटो लावलेला दिसणार नाही,असे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सांगत आहेत.

सांगा... किती गुरुजींनी आपले फोटो शाळेत लावले ; शिक्षक संघटना म्हणते एकाही नाही , शासनाने मागवला अहवाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सर्व शाळांमध्ये 'आपले गुरुजी' (aapale guruji ) या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी आपले फोटो शाळेत वर्गाच्या (Photo of teacher in school classroom) दर्शनी भागात लावावेत,  अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे वर्षभराने आता किती गुरुजींनी आपले फोटो वर्गात लावले आहेत, याचा अहवाल शिक्षण विभागाने (education department) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या संदर्भातील अहवाल शिक्षण विभागाला पुढील काही दिवसांत सादर करावा लागणार आहे.त्यामुळे शासन आणि शिक्षक यांच्यात पूर्वी झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शाळेत तोतया शिक्षक ठेवणे, स्वतः शाळेत न येणे , असे काही प्रकार शाळांमध्ये उघडकीस आले होते.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक शाळेत शिक्षकाने स्वतःचा फोटो लावावा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र शिक्षक संघटनेतर्फे या निर्णयाचा विरोध करण्यात आला होता. तसेच शिक्षक शाळेत फोटो लावणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली होती. सुमारे वर्षभरापासून त्यावर पडदा पडला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने 'शिक्षकांचा वर्गातील फोटो' हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.दरम्यान, पुण्यातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधला असता सर्व शाळांकडून फोटो विषयक माहिती मागण्यात आली असल्याचे त्यांनी एज्युवार्ताशी बोलताना सांगितले. 

हेही वाचा : Pariksha Pe Charcha : परिक्षा पे चर्चा : तुम्हालाही पंतप्रधान मोदींशी संवाद साधायचा असेल तर आजच अर्ज करा

विधिमंडळात आपले गुरुजी उपक्रमा संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्र. प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्रक काढले आहे. त्यात जिल्ह्याचे नाव, एकूण शाळांची संख्या, शिक्षकांचे फोटो वर्गात लावलेल्या शाळांची संख्या, एकूण शिक्षक संख्या आदी माहिती मागवली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचे विजय कोंबे याबाबत म्हणाले ,अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे शिक्षण विभागाने ही माहिती मागवली आहे. मात्र,शिक्षक दररोज वर्गात बसतात आणि  विद्यार्थ्यांना शिकवतात.विद्यार्थ्यांना आपल्या प्रत्येक शिक्षकांची माहिती आणि ओळख असते.त्यामुळे एकाही वर्गात शिक्षक फोटो लावणार नाही ही आमची भूमिका पूर्वीही होती आणि आजही आहे.राज्यात एकाही वर्गात शिक्षकाचा फोटो लावलेला दिसणार नाही.