वडील अर्धांगवायूने आजारी अन् आई कचरावेचक; अडचणींवर मात करत प्रज्वलाचे उत्तुंग यश 

आर्थिक अडचणींचा सामना करत जिद्दीने अभ्यास केला अन् तिने आईचा विश्वास सार्थ ठरविला. बारावीच्या परीक्षेत प्रज्वलाने ७७ टक्के गुण मिळवले आहेत.

वडील अर्धांगवायूने आजारी अन् आई कचरावेचक; अडचणींवर मात करत प्रज्वलाचे उत्तुंग यश 
HSC Result Updates

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

HSC Result : अगदी लहान असताना वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. वडिलांचे आजारपण आणि तीन मुलांची जबाबदारी स्वीकारत आईने कचरा वेचण्याचे काम सुरु केले. तिन्ही मुलांना जिद्दीने शिकवत होती. मुलांनी कामाला जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण आईला तर फक्त त्यांना शिकून मोठे होताना पहायचे होते. त्यामुळे कुठे कामही करू दिले नाही. आर्थिक अडचणींचा सामना करत जिद्दीने अभ्यास केला अन् तिने आईचा विश्वास सार्थ ठरविला. बारावीच्या परीक्षेत प्रज्वलाने ७७ टक्के गुण मिळवले आहेत. (Maharashtra HSC Result)

प्रज्वला ओहोळ असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. आपली मुलगी हुशार आहे तिला १२ वी मध्ये चांगले गुण पडतील याची खात्री होती. पण मुलीच्या यशाचे सुख पाहणार तोच काळाने पुन्हा घाला घातला. १२ वी निकाल लागण्याआधी आईचा अपघात झाला होता. आईवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांना निकालाच्या आदल्यादिवशीच घरी आणण्यात आले. त्यानंतर मुलीच्या यशाच्या बातमीने त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. 

वडिलांनी केला मुलीचा बारावीचा निकाल जाहीर; बोर्डाच्या अध्यक्षांचा असाही योगायोग

पुण्यातील चिंचवड येथील आनंदनगर या वस्तीमध्ये राहणारी प्रज्वला आकुर्डी येथील म्हाळसाकांत महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. 'एज्युवार्ता'शी बोलताना प्रज्वला म्हणाली, "मी ९ वर्षांची असताना माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. वडील कचऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर होते. पण त्यांच्या आजारपणामुळे आमचं घर कोलमडलं. आमची जबाबदारी उचलत आईने कचरा वेचण्याचे काम सुरु केले. मला दोन भाऊ आहेत. आम्ही तिघे शिकत आहोत. आईला हातभार लावावा म्हणून आम्ही कामाला जायचे ठरवले, पण आईने मात्र आम्हाला तसं करू दिलं नाही. तिला फक्त आम्हाला शिकताना पाहायचे होते."

दिव्यांग विद्यार्थ्यांचे ‘दिव्य’ यश; एकूण निकालात आघाडी

प्रज्वला सांगत होती, "मी कॉलेजला जाऊन आल्यावर घरची कामे संपवून मग अभ्यास करत होते. मला चांगले मार्क पडतील यावर आईचा विश्वास होता, पण मलाच धाकधूक वाटत होती. पण निकाल लागण्याआधी महिन्याभरापूर्वीच आईचा एक अपघात झाला त्यात तिच्या मेंदूला मार लागला. इतक्या दिवस ती icu मध्ये ऍडमिट होती. कालच तिला घरी आणलं आज निकाल लागला. ती सध्या अंथरूणाला खिळून आहे, पण माझा निकाल बघून ती खूप खुश झाली. मला माझ्या आईसाठी MPSC ची परीक्षा देऊन मोठी अधिकारी व्हायचे आहे."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo