पहिला डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार बाळासाहेब घोडे व दीपाली सावंत यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्या वतीने या वर्षांपासून एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.

पहिला डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार बाळासाहेब घोडे व दीपाली सावंत यांना जाहीर
Deepali Sawant, Balasaheb Ghode

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre), शिक्षण विकास मंचच्या (Shikshan Vikas Manch) वतीने पहिला राज्यस्तरीय डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार (Dr Kumud Bansal Best Teacher Award) दुर्गम भागात अतिशय व्रतस्थपणे काम करणारे बाळासाहेब घोडे (Balasaheb Ghode), दीपाली सावंत (Deepali Sawant) यांना जाहीर करण्यात आला आहे. घोडे हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिवनगर (डोंगरगण) येथील जिल्हा परिषद शाळा आणि सावंत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्या वतीने या वर्षांपासून एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

बाळासाहेब घोडे यांनी शिवनगर सारख्या छोट्याश्या वस्तीवरील शाळेला सृजनशील प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावली. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला आहे. अतिशय कमी पट असणाऱ्या शाळेचा पट आता दोन अंकी झाला आहे. शाळेची इमारत लोकवर्गणीतून उभी करून भवताल पर्यावरणस्नेही केल्याने शाळेतील वातावरण आनंददायी झाले आहे. मुले ही शाळेत बसली नसून बागेत बसली आहे असा अनुभव शाळेला भेट दिल्यानंतर येतो. गुणवत्तेच्या दृष्टिनेही ही शाळा जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे. ही शाळा सहजशिक्षणाचे एक केंद्र तयार झाले आहे. या शाळेला भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार देखील मिळाला आहे ही बाब उल्लेखनीय वाटते.

पूर्व प्राथमिक शाळांच्या शुल्काची लाखोंची उड्डाणे; शासन झोपेत, शुल्कावर नियंत्रण नसल्याने पालक मेटाकुटीला

 

दीपाली सावंत या वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपक्रमशील शिक्षिका म्हणून  शिक्षणक्षेत्रात परिचित आहेत. त्यांनी  दुर्गम अशा पारधी पाड्यातील  मुलांना नियमित शाळेत आणण्यासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न करून सोबतच शाळेमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या  शिकण्यासाठी आपली धडपड केल्याने ही मुले शाळेत आली, टिकली आणि शिकत आहेत.

 

राज्यभरातून नामांकन झालेल्या प्रक्रियेतून निवडक शिक्षकांच्या मुलाखती, प्रत्यक्ष शाळा भेटी यातून या दोन शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड समितीने एकमताने शिफारस केली आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ही निवड झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे,  दीप्ती नाखले, दत्ता बाळसराफ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी आणि सेंटरचे शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे यांनी ही माहिती दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO