क्लस्टर विद्यापीठासाठी किमान २ हजार विद्यार्थ्यांचे बंधन ; नियमावली झाली प्रसिध्द

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने क्लस्टर विद्यापीठासाठी नियमावली प्रसिध्द केली असून येत्या ३० जून पर्यंत त्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत.

क्लस्टर विद्यापीठासाठी किमान २ हजार विद्यार्थ्यांचे बंधन ; नियमावली झाली प्रसिध्द
cluster University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 क्लस्टर विद्यापीठाचे लीड करणा-या कॉलेजची (cluster University lead college) विद्यार्थी संख्या दोन हजार असावी, क्लस्टरमधील सर्व कॉलेज लीड कॉलेजपासून २५ किलोमीटरच्या अंतरात असावीत, क्लस्टर विद्यापीठासाठी किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच अनुदानित किंवा विनानुदानित महाविद्यालये एकाच व्यवस्थापनाखाली सुरू असावीत,अशा क्ल्स्टर विद्यापीठ स्थापनेसाठीचा प्रस्तावित नियमावलीचा आराखडा (Draft Guidelines For Establishing Cluster Universities ) राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून (State Department of Higher and Technical Education ) प्रसिध्द करण्यात आला आहे.

हेही वाचा : शिक्षण NIRF रँकिंगचा परिणाम अनुदानावर होणार का? यूजीसी अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं...

   नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शैक्षणिक संस्थांना विविध महाविद्यालयांच्या एकात्रीकरणातून क्लस्टर विद्यापीठांची स्थापना करता येणार आहे.त्यासंदर्भातील नियमावली राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रसिध्द केली असून येत्या ३० जून पर्यंत त्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येईल. मात्र, दोन कॉलेजमधील अंतरांमुळे अनेक शैक्षणिक संस्थांना क्लस्टर विद्यापीठे स्थापना करताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

डीपीआर सादर करावा लागणार :

क्लस्टर विद्यापीठासाठी संबंधित संस्थांना डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये पाच वर्षांचा संस्थेचा विकास आराखडा,पदवी व पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी अभ्यासक्रमांचा अभ्यासक्रम, सध्या अभ्यासक्रमांमध्ये एनईपीनुसार केले जाणार बदल, अभ्यासक्रमांतील नाविन्यता, विस्ताराच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, पुढील पाच वर्षांचे आर्थिक नियोजन आदी मुद्दे डीपीआरमध्ये असणे  आवश्यक आहेत. 

अशी असेल क्लस्टर विद्यापीठाची प्रक्रिया : 

क्लस्टर विद्यापीठाची नियमावली अंतिम झाल्यानंतर संस्थांकडून प्रस्ताव मागविले जातील. त्यानुसार संबंधित संस्थांनी डीपीआर सादर करणे आवश्यक आहे. सरकारकडे आलेल्या प्रस्तावांची छाननी एका विशेष समितीमार्फत केली जाईल. ही समिती संस्थेला, सहभागी महाविद्यालयांना सुध्दा भेट देईल. प्रस्तावात त्रुटी आढळून आल्यास त्याची पुर्तता करावी लागेल. त्यानंतर समितीकडून सरकारला मान्यतेबाबतचा प्रस्ताव सादर केला जाईल. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ३ (६) अंतर्गत मंत्रिमंडळ व राज्यपालांची या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतरच क्लस्टर विद्यापीठाची निर्मिती होऊ शकते.  

क्लस्टर विद्यापीठांची प्रस्तावित नियमावली : 

१) महाविद्यालयांची संख्या : 

अ. क्लस्टर विद्यापीठासाठी किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच अनुदानित किंवा विनानुदानित महाविद्यालये एकाच व्यवस्थापनाखाली सुरू असावीत. 
ब. एखाद्या संस्थेमध्ये पाचपेक्षा जास्त महाविद्यालये असल्यास राज्य सरकारकडून त्याबाबत प्रत्येक संस्थानिहाय अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल.
२. लीड कॉलेज हे २० वर्षांपासून अस्तित्वात हवे.
३. लीड कॉलेजमध्ये किमान दोन हजार विद्यार्थी प्रवेशित असावेत.
४. क्लस्टर विद्यापीठामध्ये सहभागी होणाऱ्या लीड कॉलेजसह इतर कॉलेजमधील एकूण विद्यार्थी संख्या कमीत कमी  चार हजार हवी.
५. क्लस्टरमधील सर्व कॉलेज लीड कॉलेजपासून २५ किलोमीटरच्या अंतरात असावीत. 
६. अंतराबाबत विशिष्ट परिस्थितीत वाहतूकीची सुविधा उपलब्ध असल्यास त्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाईल.
७. मुंबई महानगरासाठी दोन हेक्टर तर नागपूर, औरंगाबाद,पुणे नाशिक आदी महानगरांसाठी ४ हेक्टर आणि इतर शहरांसाठी ६ हेक्टर जागा असावी.
८. नॅक स्कोअर – लीड कॉलेजचे नॅक रेटिंग ३.२५ हवे.तसेच लीड कॉलेजसाठी ६० टक्के एनबीए अक्रिडिटेशन असावे. 
९. लीड कॉलेजव्यतिरिक्त इतर सहभागी कॉलेजकडे नॅक रेटिंग हवे किंवा किमान ३० टक्के अभ्यासक्रमांना एनबीए अक्रिडिटेशन हवे.
१०. किमान दोन संशोधन केंद्र हवीत . 
११. शैक्षणिक, संशोधन, अध्यापनामध्ये गुणवत्तापूर्ण प्रगती हवी.
१२. शासकीय निधीव्यतिरिक्त इतर माध्यमातून विविध स्त्रोत निर्माण करण्याची क्षमता हवी.
१३. अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांची आवश्यकता.
१४. एनईपी २०२० नुसार भाषिक वैविधता जपण्यासाठी प्रस्तावित क्लस्टर विद्यापीठाने काही अभ्यासक्रम मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये सुरू करणे अपेक्षित आहे.
१५. उद्योग क्षेत्राशी सध्या असलेले विविध भागिदारी करार, विद्यार्थ्यांची इंटर्नशिप आदी माहिती देणे आवश्यक. 
१६. नाविन्यता व संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध पीएचडीचा समावेश हवा.
१७. आयटी सेंटर,स्टार्ट अप सेंटर, इन्क्युबेशन सेंटर आणि त्याअनुषंगाने आवश्यक सुविधा बंधनकारक असतील.