नव्या व दूर्लक्षित अभ्यासशाखांना गवसणी घालणारे 'मराठी भाषा विद्यापीठ'  : डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी रिद्धिपूर या ठिकाणाचीच निवड का करण्यात आली ?

नव्या व दूर्लक्षित अभ्यासशाखांना गवसणी घालणारे 'मराठी भाषा विद्यापीठ'  : डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत
Dr. Dr. Shailendra Deolankar -Marathi Language University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शब्दांकन : राहुल शिंदे 

सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच पूर्वीच्या पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी झाली होती. मात्र,नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने नव्या मराठी भाषा विद्यापीठाच्या विधेयकाला (Marathi Language University Bill) मंजूरी दिली आहे.त्यामुळे मराठी भाषेतील शिक्षणाला अधिक चालना मिळणार आहे.त्यातच महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार देखील मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर आहे.पण रिद्धिपूर (Riddhipur) मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरूप कोणते असेल विद्यापीठाच्या माध्यमातून पुढील काळात कोणते अभ्यासकाम शिकवले जातील, याबाबत अनेकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत,त्यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर (Director of Higher Education Dr. Shailendra Deolankar ) यांनी 'एज्युवार्ता'ला दिलेल्या विशेष मुलाखातीतून दिली आहेत.
   

प्रश्न : 'मराठी भाषा विद्यापीठ' विद्यापीठाचे स्वरुप कसे असेल आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमाची निर्मिती हा या विद्यापीठाचा उद्देश असणार आहे का ? 

उत्तर : राज्य शासनाने महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक  डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यापीठाची उद्दिष्टे, शैक्षणिक आकृतिबंध आणि कार्यपद्धती सुचविण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमली होती. या नव्या विद्यापीठाची रचना केवळ मराठी भाषा व साहित्याचा अभ्यास करणार्‍या पारंपरिक विद्यापीठासारखी असणार नाही.तसेच या विद्यापीठांतर्गत नव्या महाविद्यालयांची स्थापना करणे हेही या रचनेत अभिप्रेत नाही.तर या विद्यापीठाचे स्वरूप हे 'एकल विद्यापीठा'च्या धर्तीचे असणार आहे. शिक्षणाच्या  आंतरराष्ट्रीय  प्रवाहांना अनुसरणारे आंतरज्ञानशाखीय  व बहुकौशल्य प्राप्त  मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी  उपयुक्‍त ठरतील, अशा नव्या अभ्यासशाखा या विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहेत. वर्तमान आणि भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन  मराठीतून  रोजगारक्षम अभ्यासक्रमांची निर्मिती व्हावी, या दृष्टीने नवे अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत.  

प्रश्न :पारंपरिक विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि या विद्यापीठातून शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात कोणता फरक असेल ? 

उत्तर : माहिती तंत्रज्ञानामुळे आणि बदलत्या जीवन पद्धतीमुळे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा विचार करून काही नवे अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांत मराठीचा सक्षम वापर वाढवावा यासाठी विद्यापीठात 'व्यावहारिक मराठी'चा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागातून कुशल सायबर मनुष्यबळ तयार करण्यासाठी  व सायबर विश्वातील मराठीचा वापर वाढविण्यासाठी विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात येणार आहे. त्यात बिग डेटा मॅनेजमेंट , मशीन लर्निंग , जाहिरातविद्या,  ऑनलाइन पतकारिता, धार्मिक प्रवचनकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य सेवक, लघूद्योजक,  व्यापारी  यांच्यासाठी ब्रँड निर्मिती व होम पेजनिर्मिती, बौद्धिक खुराकासाठी ऑनलाइन गेम्स, छंद्मंडळे, पुस्तक विक्रेते यांच्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणारे असे कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले जाईल.  

प्रश्न : मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर क्षेत्रात काही काम केले जाणार आहे का ? 

उत्तर : मराठी भाषेच्या उपयोजनाची व्याप्ती वाढविण्यासाठी  तंत्रज्ञानाधिष्ठित नवी भाषिक उपकरणे  व संसाधने निर्माण व्हावीत या भूमिकेतून या विद्यापीठात 'भाषा अभियांत्रिकी व संगणीकीय भाषाविज्ञान' (Language Engineering and Computational Linguistics) विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागामार्फत यांत्रिक भाषांतर, मराठी लेखन शुद्धीचे स्वयंचालित संसाधन, भाषा शिक्षणासाठीची संगणकीय उपकरणे विकसित करण्यात येतील. भाषा बोधन प्रक्रियेतील मेंदूतील घडामोडींचा अभ्यास व त्यानुसार वाचिक-श्रवणीय भाषा दोषांच्या समस्या निर्मूलनाची साधने विकसित केली जातील.  डिजिटल युगातील शैक्षणिक व सामाजिक  गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक सहयोगाचे आंतरजाल  (Joint  Educational NET, प्रगत संशोधकांच्या गट समूहांचे आंतरजाल (Advanced Research Projects NET), अभिरुचि व सामाजिक संबंधांचे आंतरजाल (Civics NET) स्थापन करण्यासाठी विद्यापीकडून पुढाकार घेतला जाईल. सामाईक  ज्ञाननिर्मिती, बौद्धिक संपदांचे जतन-संवर्धन, सहयोगी ज्ञान संक्रमण वाहिन्यांची  निर्मिती, शैक्षणिक साहित्याचे  संपादन व वितरण यासाठी मध्यवर्ती विश्वस्त संस्था म्हणून विद्यापीठ आपली भूमिका पार पांडेल. 


प्रश्न :मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी रिद्धिपूर या ठिकाणाचीच निवड का करण्यात आली?

उत्तर : महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र म्हणून रिद्धिपूरची महाराष्ट्राला ओळख आहे.पण मराठी भाषेच्या संदर्भातही रिद्धिपूरचे माहात्म्य मोठे आहे.'लीळाचरित्र' हा मराठीतला पहिला गद्यग्रंथ आणि महदंबेचे 'धवळे' हा पहिला लोक काव्याचा ग्रंथ रिद्धीपूरला सिद्ध झाला आहे.रिद्धिपूर परिसर ही मराठी गद्यग्रंथांची आद्यपेठ राहिली आहे.या परिसरात १३ व्या शतकात जनसामान्यांसाठी गोष्टीरूप अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानाचा बोध करणार्‍या  दृष्टांतपाठाची रचना झाली. दार्शनिक तत्त्वबोधासाठी सूत्रपाठ,संशोधनपर ग्रंथरचनेसाठी टीपग्रंथ,महाकाव्य आणि आख्यान काव्यपर रचनेचा नमुनादर्श असलेले नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर इत्यादी ग्रंथांची रचना येथेच झाली आहे. मराठी साहित्याच्या या प्रारंभिक कर्मभूमीवर मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा क्रांतदर्शी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, ही या वर्षातली एक अभिनंदनीय घटना आहे. 


प्रश्न : मराठी भाषेसह इतरही भाषांचा अभ्यास या विद्यापीठातून केला जाणार आहे का ? 

उत्तर :  भारतात आणि  जागतिक पातळीवर मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रसार व संवर्धनासाठी कार्य करणारी  प्रगत  शैक्षणिक व संशोधन संस्था म्हणून 'मराठी भाषा विद्यापीठ' आपली भूमिका पार पाडणार आहे. त्यासाठी भाषांतरविद्या व तौलनिक साहित्याभ्यास विद्याशाखा स्थापन करण्यात येणार असून या विद्याशाखेतून गुजराती, कन्नड, तेलुगू, मल्याळम, बंगाली इत्यादी भारतीय भाषांचे  आणि 'विश्वभारती'या  विभागामार्फत इंग्रजी, फ्रेंच, जपानी, रशियन, चीनी, कोरियन, अरबी-फारसी इत्यादी विदेशी भाषांचे अध्ययन, द्वैभाषिक भाषांतर व संशोधन प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. विदेशातील विद्यापीठे व शैक्षणिक-सांस्कृतिक संस्थांबरोबर सामंजस्य करार करून मराठी भाषा व संस्कृतीचे महाजाल प्रस्थापित करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय भाषाकेंद्रही स्थापन करण्यात येणार आहे.  मराठीच्या विकासासाठी दृकश्राव्य  व संगणीकीय शैक्षणिक साधनांची निर्मिती करून ऑनलाइन शिक्षणक्रम सुरू करण्याचीही योजना आहे. 

प्रश्न : केवळ मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होणार असल्याने काही नव्या ज्ञानशाखा / विद्याशाखा अस्तित्वात येणार आहेत का ? 

उत्तर : मराठी संस्कृतीच्या अभ्यासाचे पद्धतिशास्त्र  विकसित करण्यासाठी 'महाराष्ट्रविद्या' या  नव्या अभ्यासशाखेची  उभारणी  हे विद्यापीठाचे एक नवे कार्यक्षेत्र असणार आहे. या अभ्यसशाखेतून   महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील पोट संस्कृतींच्या  अभ्यासाला चालना दिली जाईल. तसेच मराठी भाषकांची क्षेत्र व्याप्ती असलेल्या परिसरातील  संगीत, चित्र, नाट्य , ललितकला, सुतारकाम, लोहारकाम, मातीकाम, भरतकाम-विणकाम इत्यादी कार्मिक कलांचा आणि लोकवैद्यक, खाद्यसंस्कृती, कृषिक्षेत्रातील पारंपरिक  लोकविद्या, लोकसाहित्य, लोककला व लोकसंस्कृतीच्या  संशोधनाला व उपयोजित शिक्षणाला  चालन दिली जाईल. महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासासाठी  हस्तलिखिते, बहुआयामी वस्तुसंग्रहालय व अभिललेखागारही विकसित करण्यात येईल. तसेच  महाराष्ट्रात यापूर्वी स्थापन झालेल्या व दीर्घकालीन अभ्यासपरंपरा जोपासणार्‍या संशोधन संस्थांच्या सहकार्याने राज्यात काही विभागीय अभ्यास व संशोधन केंद्रे स्थापन करण्याचीही तरतूद विद्यापीठ कायद्यात करण्यात आली आहे.


प्रश्न : विद्यापीठाच्या माध्यमातून मराठीचा ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा म्हणून विकास होईल का ? आणि बोली भाषा टिकवण्यासाठी विद्यापीठाकडून कसा पुढाकार घेतला जाईल? 

उत्तर : युनेस्कोच्या १९८९ च्या मानवाधिकार परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भाषिक मानवाधिकार, बोलींचे रक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.त्यानुसार भाषा विद्यापीठाचा आराखडा तयार केला आहे.समाज भाषाविज्ञान या शैक्षणिक विभागाच्या माध्यमातून  ग्रामीण व आदिवासी भागातील विविध स्थानिक बोली आणि प्रमाण मराठी यातील  भाषिक तूट भरून काढण्यासाठी भाषा विद्यापीठ राज्यस्तरीय अभियान चालविणार आहे.सर्व  आकलन क्षमतेच्या  विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी मराठीच्या भाषिक कौशल्यांवर  प्रभुत्व संपादन करणारे विविध अभ्यासक्रम  व अध्ययन सामग्री  विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर असणार आहे.आधुनिक ज्ञान-विज्ञान-तंत्रविज्ञान या सर्व क्षेत्रात मराठीचा सक्षम वापर व्हावा या दृष्टीने मराठीचा ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा म्हणून विकास व्हावा या भूमिकेतून विद्यापीठाचे शैक्षणिक प्रारूप ठरविण्यात आले आहे. यापूर्वी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याच्या संदर्भात राजारामशास्त्री भगवतांपासून द्त्तो वामन पोतदारांपर्यंत अनेक मान्यवरांनी मांडलेले विचार आणि समकालीन व भविष्यकालीन ज्ञानशाखांतील प्रगत अभ्यासशाखांच्या विस्तारित दिशा लक्षात घेऊन नव्या विद्यापीठाचे प्रारूप ठरविण्यात आले आहे.