IIT मुंबईला अनामी देणगीदाराकडून १६० कोटी रुपयांची देणगी  

एका माजी विद्यार्थ्याने संस्थेला ही देणगी दिली आहे. पण विद्यार्थ्याला आपले नाव गुपित ठेवायचे आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रात ही एक दुर्मिळ घटना आहे.

IIT मुंबईला अनामी देणगीदाराकडून १६० कोटी रुपयांची देणगी  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईला एका अनामिक देणगीदाराकडून (Anonymous Donor)तब्बल १६० कोटी रुपयांची  देणगी मिळाली आहे. संस्थेतील  'ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब ' च्या स्थापनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून (Alumni) ही देणगी देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक सुभाषिस चौधरी (Director Subhashis Chowdhary) यांनी दिली आहे.

चौधरी म्हणाले, " संस्थेच्या एका माजी विद्यार्थ्याने संस्थेला ही देणगी दिली आहे. पण विद्यार्थ्याला आपले नाव गुपित ठेवायचे आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रात ही एक दुर्मिळ घटना आहे. संस्थेला निनावी देणगी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरं तर, यूएसएमध्ये या गोष्टी  सामान्य आहेत. पण  मला वाटत नाही की भारतातील कोणत्याही विद्यापीठाला अशी निनावी  देणगी देण्यात आली असेल. देणगीदाराला  माहित आहे की IIT मुंबईला देण्यात येणारी देणगी योग्य पद्धतीने वापरली जाईल. प्राप्त झालेल्या रकमेचा वापर कॅम्पस, पायाभूत सुविधांवर ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च सेंटर (GESR) स्थापन करण्यासाठी केला जाईल तर मोठी रक्कम संशोधनासाठी ठेवली जाईल."

चौधरी म्हणाले, " GESR IIT मुंबईच्या कॅम्पसमधील अत्याधुनिक शैक्षणिक इमारतीमध्ये स्थित असेल. अक्षय ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देतो. हे बॅटरी तंत्रज्ञान, सौर फोटोव्होल्टेइक, जैवइंधन, स्वच्छ-वायु विज्ञान, पुराचा अंदाज आणि कार्बन कॅप्चर यासह अनेक गंभीर क्षेत्रांमध्ये संशोधन सुलभ करेल. "