नवभारत साक्षरता कार्यक्रमाकडे दूर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगांची कारवाई ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात वय वर्षे १५ वरील एकूण निरक्षर व्यक्ती १० लाख ६७ हजार ८२३ आहेत.

नवभारत साक्षरता कार्यक्रमाकडे दूर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगांची कारवाई ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशात निरक्षरता ही एक प्रमुख सामाजिक समस्या असून तिच्या समूळ उच्चाटनासाठी १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींसाठी केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता कार्यक्रम (Navbharat Literacy Programme)राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, या कामात दुर्लक्ष करणाऱ्या  शिक्षक व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary action against teachers and officials)करावी, असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh)यांनी दिले. 

नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय नियामक परिषद रचना  समितीच्या बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी जि.प. शिक्षणाधिकारी (योजना) तथा नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सदस्य सचिव कामलाकांत म्हेत्रे, नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक नामदेव गवळी, शासकीय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख वि. ग. तांबे, शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरवणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता एन.पी. शेंडकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा : Breaking News : विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला

 देशमुख म्हणाले, राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात असाक्षरांचे वर्ग तात्काळ सूरू करावेत. याकामी सर्व विभागांनी सहकार्य करावे. दुर्लक्ष करणारे शिक्षक व अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. 

तालुकास्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी व गट शिक्षणअधिकारी यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमात प्राधान्याने लक्ष घालून राज्यात जिल्ह्याची कामगिरी चांगली होईल, यादृष्टीने नियोजन करावे. शिक्षण संघटनांनी या कार्यक्रमावरील टाकलेला बहिष्कार तात्काळ मागे घेवून कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले. 

 म्हेत्रे म्हणाले, नवभारत साक्षरता कार्यक्राच्या 'उल्लास' ॲपमध्ये निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती व सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात वय वर्षे १५ वरील एकूण निरक्षर व्यक्ती १० लाख ६७ हजार ८२३ आहेत. पैकी २०२२-२३ या दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यासाठी एकूण ६३ हजार ९५० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून ५२५ व्यक्तींना साक्षर केल्याची नोंद उल्लास ॲपवर झाली आहे.