‘महाज्योती’ची परीक्षा वादात; खासगी क्लासचीच प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप, खुलासा मागवला

‘महाज्योती’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे यांनी पुण्यातील बावधन येथील व्हिशाईन टेक प्रा. लि. या संस्थेकडून खुलासा मागवला आहे.

‘महाज्योती’ची परीक्षा वादात; खासगी क्लासचीच प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप, खुलासा मागवला
Mahajyoti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (Mahajyoti) संस्थेतर्फे एमपीएससी (MPSC) पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेली परीक्षा पुन्हा वादात सापडली आहे. याआधीची परीक्षा गैरप्रकारांमुळे रद्द करण्यात आली होती. आता ३० जुलै रोजी झालेल्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या परीक्षेसाठी देण्यात आलेली प्रश्नपत्रिका एका खासगी क्लासच्या टेस्ट सीरिजमधील आहे तशी असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ‘महाज्योती’ने संबंधित संस्थेकडून खुलासा मागवला आहे. (Competitive Examination)

‘महाज्योती’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे यांनी पुण्यातील बावधन येथील व्हिशाईन टेक प्रा. लि. या संस्थेकडून खुलासा मागवला आहे. परीक्षेत एका क्लासच्या टेस्ट सिरीज मधून अनेक प्रश्न आल्याच्या तक्रारी विद्यार्थांनी केल्या आहेत. त्यानुसार प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कोठून घेण्यात आले, पुस्तकाचे नाव, संबंधित पृष्ठ क्रमांक यांची छायांकित प्रमाणित प्रत आदी माहिती महाज्योतीने मागितली आहे. या प्रकारात विद्यार्थांचे नुकसान होत असेल तर त्या शिफ्टचा पेपर परत घेण्यात यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

खासगी शिकवणी समितीचा अहवाल पाच वर्षांपासून धूळखात; नियमावली लागू करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याप्रकरणात उडी घेत काही प्रश्न उपस्थित केले आहे. आव्हाड यांनी ट्विट करून म्हटले आहे की, विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कसं खेळत आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाज्योतीची परीक्षा. समजलेल्या माहिती नुसार ही परीक्षा २ सत्रात झाली. दोन्ही सत्रात ज्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या त्या पूर्णच्या पूर्ण एका खाजगी क्लासच्या प्रश्न पत्रिकेच्या कॉप्या होत्या. सर्वच्या सर्व प्रश्न जे खाजगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेत होते, तेच प्रश्न महाज्योती च्या प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे उतरवले गेले आहेत. ही अत्यंत गंभीर आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारी बाब आहे.

आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाज्योती संस्थेवर राज्य सरकार जो खर्च करत आहे, तो नेमका कशासाठी करत आहे?, जर एखाद्या खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकाच जर इथले अधिकारी "सेट" करणार असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?, या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी जिवाचं रान केलं होतं. यासाठी अनेक गरीब विद्यार्थी खिशात पैसे नसताना चार-पाचशे किमी परीक्षा देण्यासाठी आले होते, त्यांचे जे नुकसान यातून झाले आहे, वरून जो मनस्ताप झाला आहे ते लक्षात घेऊन हे सरकार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?, महाज्योतीचे भ्रष्ट अधिकारी, परीक्षा घेणारी भ्रष्ट कंपनी आणि पेपर "सेट" करणाऱ्या दोषी अधिकारी लोकांवर हे सरकार कारवाई करणार का?, असे सवाल आव्हाड यांनी सरकारला केले आहेत.

त्याचप्रमाणे मागे झालेल्या महाज्योतीच्या परीक्षा आणि त्यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि खाजगी क्लास यांचा काही साटेलोटे आहे का? असे असेल तर प्रामाणिकपणे कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?, ज्ञानदीप नावाचे हे खासगी क्लासेस आहे. या खासगी क्लासवाल्यांचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे काही "आर्थिक हितसंबंध" आहेत का?, असे गंभीर आरोपही आव्हाड यांनी केले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD