विद्यापीठाचा जलतरण तलाव घोषणे पुरताच; सत्ताधा-यांना आश्वासनांचा विसर

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठातील जलतरण तलावासाठी १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

विद्यापीठाचा जलतरण तलाव घोषणे पुरताच; सत्ताधा-यांना आश्वासनांचा विसर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) उभारण्यात आलेल्या पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलात जलतरण तलाव (Swimming Pool) बांधण्यासाठी राज्य शासनातर्फे १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांनी केली होती. या घोषणेला एक वर्षाहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. त्यावर सरकार आले गेले, पुन्हा नवीन आले पण निधी मात्र मिळाला नाही. त्यामुळे जलतरण तलाव घोषणे पुरताच राहणार की, या तलावात सराव करून राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होणार हे केवळ राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे, असे मत जलतरण पटू व क्रीडा प्रेमी व्यक्त करत आहेत.

 

विद्यापीठात उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलांच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठातील जलतरण तलावासाठी १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु, काही दिवसांतच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे विद्यापीठाला निधी मिळू शकला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठाने नव्या सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला. परंतु, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नाही.सरकार बदलल्यानंतर घोषणांची पूर्तता होत नाही. मात्र, अजित पवार हे पुन्हा सत्तेत आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि वित्तमंत्री पद दोन्हीही त्यांच्याकडे आले आहे.

पुण्यातील हे उमेदवार सोलापूर विद्यापीठ कुलगुरू पदाच्या शर्यतीत

    

अजित पवार यांच्या घोषणेनंतर पुणे विद्यापीठाने तात्काळ जलतरण तलावासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही विद्यापीठातील अधिकारी निधीसाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु,शासनाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.

 

विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस, कुस्ती शूटिंग, जिम्नॅशियम, ॲथलेटिक्स असे मैदानी खेळ खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हॉकी व क्रिकेटचे मैदानाही तयार केले आहे. या क्रीडा संकुलात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कमीत कमी शुल्कात सराव करता यावा, असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. जलतरण तलावासाठी निधी मिळाला तर विद्यार्थी पोहण्याचा सराव करू शकतील. मात्र, निधी अभावी विद्यापीठाचा जलतरण तलाव सध्या 'पाण्यात'आहे. त्यामुळे जलतरण तलावाबाबत केलेल्या घोषणेची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा विद्यापीठातील अधिकारी करत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j