अखेर गणवेशावरून सरकार तोंडघशी; निर्णय बदलण्याची वेळ, शासन आदेश आला

शासनाकडून याबाबतचा आदेश गुरूवारी काढण्यात आला आहे. या आदेशामध्ये म्हटले आहे की, समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा.

अखेर गणवेशावरून सरकार तोंडघशी; निर्णय बदलण्याची वेळ, शासन आदेश आला
Scout and Guide Uniform

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

येत्या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील (Government School) इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड (scout and guide) विषयासाठी एकसमान गणवेश (School Uniform) शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार होता. पण आता हा निर्णय बदलण्यात आला असून शाळा व्यवस्थापन समित्यांवर (School Management Committee) ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. या पुढील शैक्षणिक वर्षापासून सरकारकडून महिला बचत गटांमार्फत शिलाई करून गणवेश उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शासनाकडून याबाबतचा आदेश गुरूवारी काढण्यात आला आहे. या आदेशामध्ये म्हटले आहे की, समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा. यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वितरीत करावा.

Anti Corruption : पाच महिन्यांत शिक्षण विभागातील २१ जण सापळ्यात; आरोपींच्या नावांसह सविस्तर माहिती वाचा

मोफत गणवेश योजनेंतर्गत अनेक शाळांनी व कापड उद्योजकांनी विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सन २०२३-२४ या वर्षासाठीचे गणवेश तयार करण्याचे काम केले आहे. तयार गणवेशामुळे संबंधिताचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्याना उपलब्ध करुन देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट / पँट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा. तसेच, विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Stripe) व दोन खिसे (Double Pocket) असणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

11th Admission : अकरावीची पहिली प्रवेश फेरी आजपासून; मुदतीत करा नोंदणी, अर्जाचा दुसरा भाग महत्वाचा

स्काऊट व गाईड या विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी स्काऊट व गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच, उर्वरित सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 महिला बचत गटांकडून गणवेशाची शिलाई

पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करु नये, याबाबतच्या आवश्यक त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. असे आदेशात म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo