वैद्यकीय भरती : एका मुलीसह तीन परीक्षार्थी अन् तीन केंद्रांनी मिळून केला गैरप्रकार? विभागाकडे दिली नावे

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ई-मेलद्वारे डीएमईआरला या घोटाळ्याची माहिती दिली आहे. लातूरमधील तीन संस्था व तीन संशयित परीक्षार्थींची नावेही कळविली आहेत.

वैद्यकीय भरती : एका मुलीसह तीन परीक्षार्थी अन् तीन केंद्रांनी मिळून केला गैरप्रकार? विभागाकडे दिली नावे
DMER Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या (DMER) पदभरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination) आहे. या घोटाळ्यामध्ये एका मुलीसह तीन परीक्षार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या तीन परीक्षा केंद्रांचा समावेश असल्याचा दावा समितीने केला असून याबाबत चौकशी करण्याची मागणी विभागाकडे केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची (CCTV) तपासणी केल्यास सर्व गैरप्रकार समोर येईल, असेही समितीने म्हटले आहे. (DMER Recruitment Scam)

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ई-मेलद्वारे डीएमईआरला या घोटाळ्याची माहिती दिली आहे. लातूरमधील तीन संस्था व तीन संशयित परीक्षार्थींची नावेही कळविली आहेत. डीएमईआरकडून १२ ते २० जून यादरम्यान तब्बल ५ हजार १५५ पदांसाठी परीक्षा घेतली आहे. या परीक्षेत लातूर आणि औरंगाबाद येथील काही परीक्षा केंद्रे मॅनेज झाल्याचे तिथे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितल्याचा दावा समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर व सचिव निलेश गायकवाड यांनी डीएमईआरला दिलेल्या पत्रात केला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेत घोटाळा? परीक्षा केंद्र ‘मॅनेज’ करून गुण वाढविल्याचे पुरावे

समितीने पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत TCS द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. लातूर येथील तीन परीक्षा केंद्रांवर सेंटर चालकांनी अनेक विद्यार्थ्यांना संपूर्ण उत्तरे पुरवून मदत केल्याचे तिथे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. याबाबत आमच्याकडे खात्रीशीर असे कोणतेही पुरावे नाहीत म्हणून आम्ही या परीक्षा केंद्राचे परीक्षेच्या दिवसातील सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळावे म्हणून माहितीच्या अधिकारात विनंती दाखल केली आहे. आपल्या विभागाने आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तत्काळ उपलब्ध करून द्यावे. गैरप्रकाराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थानी परीक्षा केंद्रांची नावे देतानाच अशा काही संशयित विद्यार्थांची नावेही दिली आहेत, ज्यांना केंद्र चालकांनी मदत मिळवून दिली.

आमच्याकडे याबद्दल सबळ पुरावे नसले तरी सीसीटीव्ही तपासात सर्व गोष्टी समोर येतील. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेल्या निवेदनात या गोष्टी नमूद केल्या आहेत. साक्षीदार गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या जवळचा असल्याने, गोपनीयता म्हणून आणि जीवितास धोका संभवतो म्हणून त्यांचे नाव किंवा इतर गोष्टी आताच सांगू शकणार नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

भरती बातमी : सहकार विभागात भरती; सरळसेवेने ३०९ पदे भरणार, उद्यापासून करा अर्ज

निकाल जाहीर करू नये

सध्या जरी आम्हाला फक्त या तीन परीक्षा केंद्राबाबत माहिती मिळाली असली तरी महाराष्ट्रातील इतर परीक्षा केंद्रात असे प्रकार घडले असतील का? याबाबत संशय निर्माण झाला आहे. परीक्षा पारदर्शक झाली नसल्यास किंवा गैरप्रकार करून उत्तीर्ण झालेल्या शेवटच्या उमेदवारापर्यंत आपण पोचू शकत नसल्यास या परीक्षेबाबत रद्दचा धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. म्हणून सद्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये, अशी मागणीही समितीने केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD