MPSC Exam : कुणी निकाल लावता का निकाल! चार लाख विद्यार्थ्यांना आठ महिन्यांपासून प्रतिक्षा

सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक या पदांसाठी ८ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली.

MPSC Exam : कुणी निकाल लावता का निकाल! चार लाख विद्यार्थ्यांना आठ महिन्यांपासून प्रतिक्षा
Combined Prelims Exam Group B

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल वेळेत न लागण्याचे सत्र अजून सुरूच आहे. मागील वर्षी ८ ऑक्टोबर रोजी ८०२ पदांसाठी घेतलेल्या संयूक्त पूर्व परीक्षा गट ब (Combined Prelims  Exam Group B) या परीक्षेचा निकालही आठ महिन्यांपासून रखडला आहे. तब्बल चार लाखांहून अधिक विद्यार्थी निकाल लागत नसल्याने तणावात आहेत. या भरतीसंदर्भात तृतीयपंथीयांचा अहवाल काही महिन्यांपासून धूळखात पडून आहे. त्याला मंजूरी मिळत नसल्याने विद्यार्थी हताश होऊ लागले आहेत. (MPSC Exam Result)

सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक या पदांसाठी ८ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर तृतीयपंथियांना पीएसआय पदासाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालय व महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनास तृतीयपंथीयांना पोलीस दलात सामावून घेण्यासाठी धोरण निर्माण करण्यासाठी निर्देश देण्यास आले होते. सरकारने त्यावर समितीही नेमली. समितीकडून अहवालही सादर करण्यात आला आहे. पण त्यावर अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेले नाही.

अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी, कृषी अशा २२ अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया गुरूवारपासून

शासन परिपत्रक आल्याशिवाय एमपीएससीकडून निकाल जाहीर केला जाणार नाही. त्यामुळे सरकारने तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने निर्णय घेऊन त्याबाबतचे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. लाखो विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. वय वाढत चालले असून अनेकांची स्वप्न धूसर होत चालली आहेत. विद्यार्थी हतबल होत चालल्याने एका विद्यार्थ्याने सांगितले.

दरम्यान, याबाबत आमदार बच्चू कडू यांनीही महिनाभरापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. लाखो विद्यार्थी तणावात आहेत. त्यातच पूर्व परीक्षेचा निकाल न लागल्यामुळे व २०२३ पासून अभ्यासक्रम बदल्यामुळे कोणता अभ्यास करावा ह्या संभ्रमात लाखो मुले आहेत. पोलीस भरती प्रमाणे आपण तात्काळ संबंधित समितीला निर्देश देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला वर्ग ब मुख्य परीक्षा २०२२ घेण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी, अशी काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी कडू यांनी पत्राद्वारे केली होती.

चार लाखांहून अधिक विद्यार्थी प्रतिक्षेत

''दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी MPSC द्वारे ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब पार पडली असून, केवळ तृतीय पंथीचा अहवाल हा मंत्रिमंडळ मध्ये अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्या पर्यंत पोहचला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यास मार्गी लागू शकतो. ८ महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित आहे, जवळपास ४ लाख २० हजार उमेदवार हे निकालाच्या प्रतिक्षेत आहे.''

- महेश बडे, विद्यार्थी प्रतिनिधी

 

या पदांसाठी झाली परीक्षा

सहायक कक्ष अधिकारी - ४२

पोलीस उपनिरीक्षक - ६०३

राज्य कर निरीक्षक - ७७

दुय्यम निबंधक/ मुद्रांक शुल्क - ७८

एकूण पदे - ८०२

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo