उन्हाळी शिबिरे ; मुलांचे कलागुण तपासण्याची प्रयोगशाळा

विरंगुळा म्हणून या शिबिरांकडे न पाहता शिक्षणाव्यतिरिक्त तुमच्या मुलांचे कलागुण तपासण्याची प्रयोगशाळा म्हणून पहावे . 

उन्हाळी शिबिरे ; मुलांचे कलागुण तपासण्याची प्रयोगशाळा

परीक्षा संपून उन्हाळी सुट्या लागल्या की आधी पालक आणि मुलांना आजोळी जाण्याचे वेध लागायचे, बागेत जायचे, दिवसा  आणि रात्री फक्त मित्र मैत्रिणींसोबत भटकंती आणि खेळ... पण आता हे चित्र बदलले आहे. सुट्टीमध्ये मुलांचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून अनेक पालक आपल्या पाल्यांना उन्हाळी  शिबिरांमध्ये टाकतात. उन्हाळी शिबिरांच्या सुध्दा जाहिराती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. यामध्ये  सर्व  प्रकारच्या छंदवर्ग, अभिनय आणि गायन कार्यशाळा,  पेंटिंग्ज, जिम्नॅस्टिक्स, अ‍ॅथलेटिक्स, ट्रेकिंग, आदींचा समावेश असतो. 

पण अशा शिबिरांमध्ये पाठवताना पालकांनी आधी शिबिराचे महत्व समजून घेतले पाहिजे.  फक्त कुणाचे तरी पाल्य जातात म्हणून आपल्या पाल्यानाही अशा शिबिरांमध्ये पाठवणे किंवा विरंगुळा म्हणून या शिबिरांकडे न पाहता शिक्षणाव्यतिरिक्त तुमच्या मुलांचे कलागुण तपासण्याची प्रयोगशाळा म्हणून पहावे .

 

उन्हाळी शिबिरांतून मुले अनेक गोष्टी शिकतात. मात्र या एका महिन्याच्या किंवा काही आठवड्याच्या शिबिरामधून सर्वच गोष्टी शिकायला मिळतात, असे नाही. याउलट वर्षभर चालणा-या शिबिरांतून मुले अनेक गोष्टी शिकतात. अभिनय आणि संगीत या कला काही आठवडय़ांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये शिकण्यासारख्या गोष्टी नाहीत. त्यासाठी अनेक वर्षाची साधना लागते. रोज तालीम घेणे, त्यांचे संवाद सुधारणे, आवाजाची फेक, चेहऱ्यावरील अभिनय, मूक अभिनय, एकपात्री अभिनय या गोष्टी शिकण्यासाठी मोठा कालावधी लागतो.  मात्र उन्हाळी शिबिरांतील सहभागामुळे तुमच्या मुलाची किंवा मुलीची आवड कशात आहे, याची चाचपणी घेता येऊ शकते. ती आवड कायम जपण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाऊ शकतात.

या बाबत  'एज्युवार्ता' सोबत बोलताना बालरंगभूमीचे अध्यक्ष प्रकाश पारखी म्हणाले, "  मागील ४४ वर्षांपासून मी नाट्यसंस्काराचे काम करतो. यामधून फक्त एक चांगला कलाकारच घडतो असे नाही तर चांगला रसिक प्रेक्षकही घडतो. विशेष म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. मुले विचार करायला लागतात, त्यांच्यामध्ये सामाजिकता निर्माण होते.

 " सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, योगेश सोमण, सक्षम कुलकर्णी असे अनेक कलाकार माझ्या सानिध्यात घडले. माझ्या संस्थेने रंगभूमीला  रंगभूषाकार, वेशभूषाकार दिले. आज माझे काही विद्यार्थी फक्त कला क्षेत्रात नसून डॉक्टर, इंजिनिअर, समाजसेवक आहेत. यामुळे उन्हाळी शिबिरांचा मुलांच्या घडण्यामध्ये मोठा वाटा असतो."

- प्रकाश पारखी , अध्यक्ष, बालरंगभूमी