बीबीए , बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी घेण्यास मान्यता

शासनाने  बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिलेली आहे.

बीबीए , बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी घेण्यास मान्यता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell)बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम (BBA, BCA, BMS and BBM)अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा सीईटी परीक्षा घेण्यात आली.मात्र, उपलब्ध जागांच्या तुलनेत सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी होती.परिणामी महाविद्यालयांमधील हजारो जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात होती.त्याचाप्रमाणे पुन्हा एकदा बीबीए , बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी,असही मागणी केली जात होती.अखेर शासनाने अतिरिक्त सीईटी घेण्यास मान्यता (Approval to take additional CET)दिली आहे.त्यामुळे बीबीए, बीसीए आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे.

सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता या कार्यालयामार्फत दिनांक २९/०५/२०२४ रोजी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये असंख्य उमेदवार सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार/पालक /संस्था यांनी या कार्यालयास व्यक्तीशाः भेट देऊन, विनंती अर्ज सादर करून, ई-मेल द्वारे त्याच प्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केलेली होती.

उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने  बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिलेली आहे. संबंधित परीक्षेबाबत या सीईटी सेल मार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सुचना पाहण्यासाठी या संकेस्थळाला नियमितपणे भेट द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.