वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात सुरु होतोय कृषी ड्रोन अभ्यासक्रम 

नॅशनल अॅग्रीकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट केंद्राद्वारे सहा महिन्यांचा कृषी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम १८ मेपासून सुरु होत आहे.

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात सुरु होतोय कृषी ड्रोन अभ्यासक्रम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नव्या शैक्षणिक धोरणामुळे (New educational policies) शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. तंत्रज्ञानाची जोड घेऊन आता वसंतरराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात (Vasantarrao Naik Marathwada Agricultural University) पदवीधरांसाठी कृषी ड्रोन अभ्यासक्रम (Agricultural Drone Course) सुरु होत आहे. नॅशनल अॅग्रीकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट केंद्राद्वारे सहा महिन्यांचा कृषी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम येत्या १८ मेपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना या कोर्समुळे नव्या तंत्रज्ञानाची ओळख निर्माण होऊन शेतीला मदत मिळणार आहे. 

या अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्सधारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्या मध्ये पीक निरीक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोनद्वारे पीक रोग तपासणी, फवारणीसारखी विविध कामे करण्याची संरचना समाविष्ट करण्यात आली आहे. 

हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय यांसारख्या क्षेत्रात नोकरी व स्वतःचा व्यवसाय करता येवू शकतो. मागील ४ वर्षांपासून  नॅशनल अॅग्रीकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात मोठे कार्य केलेले आहे. संशोधन विद्यार्थ्यांना तंतोतंत कृषी व्यवसायिकता साधण्यासाठी या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

वसंतरराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणी हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार आहेत. अभ्यासक्रमातील कृषी विषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले. या अभ्यासक्रमाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून, अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संकेतस्थळावर नोंद करावा.