एम्स इन्स्टिट्यूटने 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ‘अभाविप’चा आरोप; 'पुंगी बजाओ आंदोलन'

81 हजार इतकेच शुल्क घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडून 4 लाख तर काहींचे 5 लाख इतके शुल्क आकारले जात होते.

एम्स इन्स्टिट्यूटने 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ‘अभाविप’चा आरोप;  'पुंगी बजाओ आंदोलन'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील एम्स इन्स्टिट्यूट (AIMS Institute) कडून 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने एम्स इन्स्टिट्यूट येथे 'पुंगी बजाओ आंदोलन'  करण्यात आले. एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी Fee Regulatory Authority (FRA) नुसार, 81 हजार इतकेच शुल्क घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडून 4 लाख तर काहींचे 5 लाख इतके शुल्क आकारले जात होते. या विषयात प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही दाखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरूवारी कॉलेजच्या बाहेर आंदोलन केले. 

कोंढवा येथील ट्रिनिटी कॉलेज (TRINITY COLLEGE) आणि शिवणे येथील अस्मा इन्स्टिट्यूट (ASMA INSTITUTE) मध्ये देखील असाच प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. गेल्या 6 महिन्यातील फसवणुकीची अशी तिसरी घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) कार्यक्षेत्रातील या महाविद्यालयांमध्ये अशा घटना वेळोवेळी होत असून देखील विद्यापीठ प्रशासन अजूनही गप्प आहे, असाही आरोप अभाविपकडून केला जात आहे.   

दरम्यान, अशा बोगस महाविद्यालय (Bogus College) व एज्युकेशन पार्टनर (Education partner)च्या नावावर अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक लुटमार(Financial robbery) केली जात आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभाविपतर्फे  आंदोलन केले जात आहे, असे अभाविपचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे (Harshwardhan Harpude) यांनी सांगितले.