Edu Varta Impact : विद्यापीठातील अश्लील रॅप प्रकरणात पोलीसांची मोठी कारवाई

'एज्युवार्ता'ने सर्वप्रथम या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी पोलिसांकडे तक्रार केली होती.

Edu Varta Impact : विद्यापीठातील अश्लील रॅप प्रकरणात पोलीसांची मोठी कारवाई
SPPU Rap Song Viral

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क        

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आवारात तसेच मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सरस्वती सभागृह मध्ये विनापरवानगी शिव्या देऊन रॅप सॉंगचे चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) शुक्रवारी मोठी कारवाई केली. रॅप साँगमध्ये (Rap Song in SPPU) दिसणाऱ्या तसेच चित्रीकरणात सहभागी असलेल्या काही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 'एज्युवार्ता'ने सर्वप्रथम या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी पोलीसांकडे तक्रार केली होती. (Savitribai Phule Pune University Latest News)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे सहायक सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी यांनी याप्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या मदतीनेच पोलिसांनी वसतिगृहातून एकाला ताब्यात घेतले. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सुत्र हलवत दोषींना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. शुक्रवारी दुपारपर्यंत बहुतेक दोषींना पोलिसांनी पकडल्याचे समजते. विद्यापीठाच्या सभागृहामध्ये व आवारामध्ये अत्यंत अश्लील शिव्या देऊन रॅप सॉंगचे चित्रीकरण करण्यात आले होते. तसेच सोशल मीडियावर ते व्हायरल झाले होते. मात्र यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. तसेच तीव्र शब्दात निषेध नोंदवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ‘एज्यूवार्ता’चे वत्त प्रसिध्द झाल्यानंतर विद्यापीठाने खुलासा प्रसिध्द केला होता. त्यात विद्यापीठाची परवानगी न घेता ही चित्रीकरण केल्याचे नमूद केले होते.

हेही वाचा : पुणे विद्यापीठात शिव्यांचा 'रॅप'

ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या आवारात व इमारतीमध्ये अनेक चित्रपटांचे व शॉर्ट फिल्मचे शूटिंग केले जाते. विद्यापीठ प्रशासनातर्फे त्यासाठी शुल्क आकारले जाते. परंतु, विद्यापीठाची इमारत किंवा परिसर भाडेतत्त्वावर देण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटली, ग्लास ठेवून विद्यापीठाच्या सभागृहात रॅप सोंग चित्रित करण्यात आले आहे. तसेच रॅप साँग मध्ये अश्लील शिव्यांचा भडीमार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इमारतीमध्ये व आवारामध्ये अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यास परवानगी कशी दिली, असा प्रश्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे पाटील यांनी उपस्थित केला होता.

एकाला वसतिगृहातून ताब्यात

विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सूरज गुट्टी याला विद्यापीठाच्याच वसतीगृह क्रमांक ९ मधून पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच विशाल हंबे पाटील, विकी गायकवाड, शुभम दौंडकर, अवी मेंगाडे, ऋषिकेश फुले, पृथ्वीराज जाधव, दिग्दर्शक शुभम नंदकुमार राऊत, सिनेमॅटोग्राफर सागर कचवा व छायाचित्रकार श्रेयश शाळीग्राम यांनी विद्यापीठ आवारात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे रॅप सॉंगसाठी चित्रीकरण केल्याची तक्रार विद्यापीठाकडून पोलिसांना देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या परिसराचा वापर अनधिकृतपणे चित्रीकरण करण्यासाठी व त्यात तलवार पिस्तूल मद्याची बाटली अश्लील शब्दांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी व इतर व्यक्तींना भडकावणे, मनात लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करणारे दहशत पसरविणारे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बदनामी करणारे चित्रीकरण या रॅप सॉंग मध्ये करण्यात आल्याने विद्यापीठाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.