सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालाबाबत शंका बाळगू नये; सीईटी सेलचे आवाहन  

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात होत्या त्यासंदर्भात सीईटी सेलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सामाईक प्रवेश परीक्षा निकालाबाबत विद्यार्थी,पालक, संस्थांनी शंका बाळगू नये, असे सीईटी सेलने म्हटले आहे.   

सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालाबाबत शंका बाळगू नये; सीईटी सेलचे आवाहन  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) करीता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल (MHT-CET Exam Result) ४ दिवसांपुर्वी प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात होत्या. त्यासंदर्भात सीईटी सेलकडून स्पष्टीकरण (Explanation from CET Cell) देण्यात आले आहे. सामाईक प्रवेश परीक्षा निकालाबाबत विद्यार्थी,पालक, संस्थांनी शंका बाळगू नये, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.   

पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली असून त्याचा निकाल १६ जून रोजी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने लावण्यात आलेला असून संबंधीत पर्सेंटाईल काढण्याची पद्धतीबाबत दि. १७ जून रोजी उमेदवार, पालक, संस्था यांच्या माहितीसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांच्या लाॅगीनमध्ये उमेदवारास देण्यात आलेली संबंधीत सामाईक प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी दिलेले उत्तर व अचूक उत्तर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 

उमेदवारांकडून प्रश्न व उत्तरांबाबत काही आक्षेप असल्यास ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी करुन घेण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने सदरील अवक्षेपांचे निराकरण करुन ७ जून रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली. या संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पर्सेंटाईल पद्धतीने तयार झालेला निकाल विशेष तज्ज्ञांकडून पडताळणी करून लावण्यात आलेला आहे. संबंधित उमेदवारांकडून प्राप्त विनंती अर्जाचे शंका निराकरण राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येत आहे. याबाबत उमेदवार, पालक, संस्था यांनी निकालाबाबत कोणतीही साशंकता बाळगू नये,असे सीईटी सेलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.