कुलगुरूंनी कीर्तन परंपरेचा अपमान केला, माफी मागा! 'अभाविप'चा आरोप

अभाविप विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूंच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असे मत अभाविप पुणे महानगरमंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी व्यक्त केले आहे.

कुलगुरूंनी कीर्तन परंपरेचा अपमान केला, माफी मागा! 'अभाविप'चा आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) शनिवारी (दि. २३ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) निमित्ताने कीर्तनकार चारुदत्त आफळे (Charudatta Aphale) यांचे कीर्तन आयोजित केले होते. परंतु कीर्तन कार्यक्रमाच्या वेळेवर विद्यापीठ प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होता कामा नये, असे आदेश सुरक्षा विभागाला देत विद्यार्थ्यांनी कार्यक्रम केला तर कायदेशीर कारवाई करू असे पत्र प्रशासनाने काढले, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला आहे. कार्यक्रमाच्या वेळेवर ३०-४० सुरक्षा रक्षकांना तैनात करून विद्यार्थ्यांना गणपती जवळ येण्यापासून अडवणूक केल्याचा दावाही परिषदेने केला आहे.

 

अभाविपकडून याबाबत काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मागच्याच महिन्यात वारंवार वारकरी संप्रदायावर आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या एका समाज आणि धर्मविरोधी संघटनेच्या कार्यक्रमाला सन्माननीय कुलगुरू फक्त परवानगीच देत नाहीत, तर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद स्वीकारून कार्यक्रमाला उपस्थित देखील राहतात. हा कार्यक्रम एका संघटनेच्या नावाने जर विद्यापीठात होऊ शकतो तर मग सामान्य विद्यार्थी महाराष्ट्राची परंपरा असलेले समाज प्रबोधनासाठीचे उत्तम माध्यम असलेले कीर्तन आयोजित का करू शकत नाही?

राज्यातील २२ विद्यापीठांतून पुण्यात येणार ‘अमृत कलश’; जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपुर्द करणार

 

खरे तर महाराष्ट्रात ८०० वर्ष वारी आणि कीर्तन परंपरेची संस्कृती चालत आलेली आहे. जी परंपरा मुघलांनी, ब्रिटिशांनी प्रयत्न करूनही बंद झाली नाही, त्या परंपरेचा भाग असलेले कीर्तन सन्माननीय कुलगुरू पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या दंडुकेशाही चा वापर करून बंद पाडू पाहत होते का?, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

एकीकडे कालच कुलगुरूंनी मोठ्या साऊंडच्या आवाजात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरणुकीसाठी परवानगी दिली परंतु विद्यार्थ्यांना हितकारक अशा ठरू शकणाऱ्या कीर्तनाला परवानगी नाकारली. हा आकस केवळ किर्तन आयोजित करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होता का? कुलगुरूंची ही दुटप्पी भूमिका पटणारी नाही. अशा कीर्तन परंपरेविषयी केवळ द्वेष आणि आकस मनात ठेऊन सन्माननीय कुलगुरू सुरेश गोसावी ह्यांनी कीर्तनाला वेळेवर परवानगी नाकारून कीर्तन परंपरेचा अपमान केला आहे, असा आरोप अभाविपने केला आहे.

 

या संपूर्ण कृतीवर विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा अभाविप विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूंच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असे मत अभाविप पुणे महानगरमंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी व्यक्त केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j