शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

रेलिंगवर खेळताना अचानक त्याचा तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला.

शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शाळेत जिन्यावरून खाली उतरत असताना सार्थक हर्षवर्धन कांबळे (Sarthak Harshvardhan Kamble) या विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून दुर्देवी अंत झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत (Pimpri Chinchwad Municipal Corporation)चालवल्या जाणाऱ्या हुतात्मा चापेकर बंधू माध्यमिक विद्यालयात (hutatma Chapekar Bandhu Secondary School) ही धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवड पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

या दुर्घटनेमुळे पालक आणि नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेची इमारत उंच असून जिन्यातील रेलिंग, संरक्षक कठडयाची उंची कमी असल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इमारतीच्या आतील बाजूस संरक्षक जाळ्या  नसल्याची बाब देखील समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सार्थक दुपारी 12 च्या सुमारास तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. रेलिंगवर घसरगुंडी खेळणे धोकादायक आहे,  याची कल्पना एका मित्राने सार्थकला दिली होती. तू येथे खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असे म्हणत त्याला रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र, सार्थक ने तो ऐकला नाही. रेलिंगवर खेळताना अचानक त्याचा तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. सार्थक पडल्यावर शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. त्याच्या पालकांना घडलेली घटना सांगितली. या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला होता. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान,  या घटनेची सखोल चौकशी करून कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.