NCERT पाठ्यपुस्तकांमधून आमची नावे काढून टाका नाहीतर... ; योगेंद्र यादव, सुहास पळशीकरांचे एनसीईआरटीला पत्र

एनसीईआरटीने ११ वी आणि १२ वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकांत यंदा काही बदल केले आहेत. यावरून विरोधी पक्ष तसेच शैक्षणिक क्षेत्रातून टीका होत असताना आता पुस्तकावर लेखक म्हणून नाव असलेल्या या दोन शिक्षणतज्ज्ञांनी एनसीईआरटीला पत्र पाठवून आपली भूमिका मांडली आहे.

NCERT पाठ्यपुस्तकांमधून आमची नावे काढून टाका नाहीतर... ; योगेंद्र यादव, सुहास पळशीकरांचे एनसीईआरटीला पत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्चच्या (NCERT) राज्यशास्त्र (Political science) या विषयाच्या पुस्तकावर लेखक म्हणून आपली नावे छापण्यावर शिक्षणतज्ज्ञ योगेंद्र यादव (yogendra yadav) आणि सुहास पळशीकर (suhas palshikar) यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एनसीईआरटीला पत्र पाठविले आहे. पाठ्यपुस्तकांवर नाव असणे ही एकेकाळी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मात्र,आता तीच गोष्ट लाजीरवाणी झाली आहे, अशा शब्दांत दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय या दोघांनी पत्र लिहून त्यांच्या नावाची ही पुस्तके तात्काळ काढून टाकावीत अन्यथा कायदेशीर मार्ग स्वीकारू (Take the legal route) असा इशाराही दिला आहे.

एनसीईआरटीने ११वी आणि १२वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकांत यंदा काही बदल केले आहेत. यावरून विरोधी पक्ष तसेच शैक्षणिक क्षेत्रातून टीका होत असताना आता पुस्तकावर लेखक म्हणून नाव असलेल्या या दोन शिक्षणतज्ज्ञांनी एनसीईआरटीला पत्र पाठवून आपली भूमिका मांडली आहे. आपली नावे वापरून राजकीयदृष्ट्या पक्षपाती,  शैक्षणिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेली पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ नयेत. आपल्या नावांसह पाठ्यपुस्तके वितरित झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

नुकत्याच बाजारात उपलब्ध झालेल्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारित स्वरुपात आजही पळशीकर आणि योगेंद्र यादव यांच्या नावाचा मुख्य सल्लागार म्हणून उल्लेख आहे. पूर्वीची पाठ्यपुस्तके ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब होती, पण आता ती लाजीरवाणी झाली असल्याचे ते सांगतात. पुस्तकांमधील मजकूर कमी केल्यामुळे ते आता शैक्षणिकदृष्ट्या अयोग्य झाले आहेत. त्यामुळे  त्यांचे नाव काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, सुधारित पाठ्यपुस्तकांमध्येही त्यांचे नाव समाविष्ट आहेत.

याशिवाय त्यांनी आपल्या पत्रात NCERT ने आमच्यापैकी कोणाचाही सल्ला न घेता या पद्धतीचा अवलंब केला आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये छेडछाड करण्याचा कोणताही नैतिक किंवा कायदेशीर अधिकार नाही, परंतु,आम्ही स्पष्ट नकार देऊनही त्या आमच्या नावासह प्रकाशित केल्या गेल्या."  असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, सुधारित इयत्ता 12 एनसीईआरटीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्यात बाबरी मशिदीचा उल्लेख तीन घुमटाची रचना असा आहे. तसेच पाठ्यपुस्तकांमधून नुकत्याच काढलेल्या मजकुरात भारतीय जनता पक्षाची गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्येपर्यंतची रथयात्रा,  कारसेवकांची भूमिका,  बाबरी मशीद विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर जातीय हिंसाचार,  भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणि भाजपची अभिव्यक्ती यांचा समावेश केला गेला असल्याची चर्चा आहे.