TET पेपर पूर्वी दीड तास आधी हजर रहा;आधारकार्डची होणार पडताळणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. नोव्हेंबर मध्ये टीईटी झाल्यानंतर पुन्हा एप्रिल-मे महिन्यात दुसरी टीईटी परीक्षा प्रस्तावित आहे.

TET पेपर पूर्वी दीड तास आधी हजर रहा;आधारकार्डची होणार पडताळणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य परीक्षा परिषदेतर्फे (State Examination Council) घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (टीईटी) परीक्षेत गैरप्रकार होऊ नये, या उद्देशाने पुढील वर्षांपासून उमेदवारांच्या आधारकार्डची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस उमेदवार परीक्षेला प्रविष्ट होण्यासारखे प्रकार टाळता येतील. तसेच येत्या रविवारी 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी (TET Exam)उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर रहावे लागणार आहे. सकाळी १०.३० मिनीटांनी होणाऱ्या पहिल्या पेपरला ठीक ९ वाजता तर दुपारच्या सत्रातील पेपर भाग २ हा दुपारी २.३० मिनिटांनी सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दुपारी १ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे,असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे (Chairman of the Examination Council Dr. Nandkumar Bedse)यांनी सांगितले. 

 राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या रविवारी 23 नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बेडसे बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. अनुराधा ओक उपस्थित होत्या. बेडसे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. नोव्हेंबर मध्ये टीईटी झाल्यानंतर पुन्हा एप्रिल-मे महिन्यात दुसरी टीईटी परीक्षा प्रस्तावित आहे. परीक्षेनंतर पुढील ४५ दिवसात टीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

डॉ. बेडसे म्हणाले, टीईटी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेत अजून पारदर्शकता यावी यासाठी टीईटी उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी केली जाणार आहे.परीक्षेसाठी कठोर उपाययोजना केल्या तरी काही त्रुटी राहू शकतात. त्यामुळे बोगस उमेदवारांवर प्रतिबंध घालण्यासाठी आधार कार्ड पडताळणी हा योग्य पर्याय आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र डीजीलॉकर मध्ये ठेवण्याची सुविधा दिली जाईल. बऱ्याचदा टीईटी प्रमाणपत्र गहाळ झाल्यानंतर उमेदवारांना अडचणी येतात. त्यामुळे डिजीलॉकरचा पर्याय उपलब्ध असल्यास उमेदवारांची समस्या दूर होईल.

टीईटी परीक्षेसाठी मराठी माध्यमातून परीक्षा देणारे उमेदवार सर्वाधिक आहेत. मराठीत ३ लाख २७ हजार १३५, इंग्रजीतून २८ हजार ४३७, उर्दु माध्यमातून २५ हजार ९३५, हिंदी माध्यमातून ९२ हजार ४२०, बंगाली माध्यमातून १६८, कन्नड माध्यमातून १ हजार ४६८, तेलगू माध्यमातून ३०, गुजराथी माध्यमातून ७५ व सिंधी माध्यमातून फक्त १ उमेदवारांची नोंद झाली. तसेच राज्यातून ५ हजार २८३ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली आहे,असेही डॉ. बेडसे यांनी सांगितले.
--------