YCMOU Admission : विद्यापीठाची कमाल, शुल्कवाढ होऊनही विद्यार्थ्यांचा ओढा वाढला

विद्यापीठाच्या शुल्कात यंदा १३ वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. पण सध्या विद्यापीठाकडे येत असलेल्या प्रवेश अर्जांची संख्या पाहिल्यास विद्यार्थ्यांचा ओढा कायम असल्याचेच चित्र आहे.

YCMOU Admission : विद्यापीठाची कमाल, शुल्कवाढ होऊनही विद्यार्थ्यांचा ओढा वाढला
YCMOU Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) शुल्कामध्ये यावर्षी १८ टक्के शुल्कवाढ करण्यात आली आहे. मात्र, या शुल्कवाढीचा (Increase in Fee) कोणताही परिणाम विद्यापीठाच्या प्रवेशावर झालेला नाही. विद्यार्थ्यांचा (Students) विद्यापीठाकडील ओढा वाढतच असून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक प्रवेश अर्ज प्राप्त झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसते. ही वाढ तब्बल १७४ टक्के एवढी असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

विद्यापीठाच्या शुल्कात यंदा १३ वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. पण सध्या विद्यापीठाकडे येत असलेल्या प्रवेश अर्जांची संख्या पाहिल्यास विद्यार्थ्यांचा ओढा कायम असल्याचेच चित्र आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे (Dr. Sanjeev Sonawane) यांनी ही वाढ कोणताही नफा कामावण्यासाठी केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यापीठाला एका विद्यार्थ्यांमागे विद्यापीठ फंडातून सुमारे १ हजार ६०० रुपये खर्च करावे लागत होते. त्यामुळे दरवर्षी विद्यापीठाला स्वत:च्या फंडातून ८० कोटी रुपये खर्च करावे लागत होते. हा खर्च जुळवून आणण्यासाठीच विद्यापीठाने शुल्कात काही प्रमाणात वाढ केली आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुक्त विद्यापीठाच्या शुल्कात १८ टक्के वाढ ; ७० ते ७५ टक्के शुल्कवाढीचे कुलगुरूंकडून खंडन

दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाकडे विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत ३ लाख २ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. तर मागीलवर्षी दि. १९ ऑगस्टपर्यंत प्राप्त अर्जांची संख्या १ लाख ६३ हजार एवढीच होती. यामध्ये तुलना केल्यास यंदा अर्जांमध्ये झालेली वाढ तब्बल १७४ टक्के एवढी आहे. मागील वर्षी एकूण प्रवेश सुमारे ५ लाख चार हजार एवढे होते. सध्याच्या अर्जांचा ओघ बघता यंदा प्रवेश अधिक होण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी एमबीए, बीएड आणि कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश वगळून देण्यात आली आहे.

राज्यात मागील वर्षी सर्वाधिक प्रवेश नांदेड विभागात जवळपास ८३ हजार झाले होते. त्याखालोखाल अमरावती, पुणे आणि नाशिक विभागाचा क्रमांक लागतो. तर यंदा आतापर्यंत सर्वाधिक सुमारे ५२ हजार प्रवेश अर्ज नांदेड विभागातूनच आले आहेत. त्याखालोखाल पुणे व नाशिक विभाग आहे.

विद्यापीठामध्ये झालेल्या प्रवेशाची तुलनात्मक स्थिती

विभाग

प्रवेश अर्ज प्राप्त (दि. २०) मागील वर्षीचे अर्ज (दि. १९) मागीलवर्षी एकूण प्रवेश
नांदेड  ५१,७७९ २४,३०४ ८२,८३७
नाशिक ४८,३६९ २८,३९५ ७५,१८७
पुणे ४८,५७८ २७,००५  ७९,७८४
अमरावती ४२,९०८ २३,४२२ ८२,०४१
नागपूर ३७,५६९ १५,४४६ ६२,७२४
औरंगाबाद २९,७६३ १९,४५५ ४८,६१८
मुंबई  २६,६०३ १५,०२९ ३८,६१८
कोल्हापूर १७,१३८ १०,२७९ ३४,७९९
एकूण  ३,०२,७०७ १,६३,३३५ ५,०४,६०८

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo