विद्यापीठाने घसरलेले NIRF रँकिंग पुन्हा मिळवावे : प्रकाश जावडेकरांची अपेक्षा

सध्यस्थितीत विद्यापीठ रॅकिंगमध्ये काही प्रमाणात मागे आहे. परंतु खूप मेहनत करून त्या स्थानावर पुन्हा पोहचतील; जावडेकर

विद्यापीठाने घसरलेले NIRF रँकिंग पुन्हा मिळवावे : प्रकाश जावडेकरांची अपेक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) मुलींच्या वसतीगृहासाठी (Girls Hostel) राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांच्या खासदार निधीतून साडे आठ कोटी रुपयांचा निधी (A fund of eight and a half crore rupees) देण्यात आला असून कदाचित एकाच कामासाठी एवढा मोठा निधी दिल्याचा हा विक्रम असावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एनआयआरएफ रॅकिंगमध्ये (NIRF Racking) सुरूवातीला आठवा क्रमांक मिळवला होता. सध्यस्थितीत विद्यापीठ रॅकिंगमध्ये काही प्रमाणात मागे आहे. परंतु, खूप मेहनत करून त्या स्थानावर पुन्हा पोहचतील, अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली. 

खासदार जावडेकर म्हणाले, विद्यापीठ ही माझी पहिली कर्मभूमी आहे. विद्यापीठाचा विद्यार्थी आणि बारा वर्षे अधिसभा सदस्य म्हणून मी काम केले, तसेच विद्यापीठाबाबत चर्चा, आंदोलने, भेटी गाठी आणि चांगले उपक्रम याबाबतच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केला तो सुद्धा मी विद्यापीठातच केला. विद्यापीठात सुरू झालेल्या नव्या उपक्रमांचाही मी साक्षीदार व भागिदार आहे. त्यामुळे विद्यापीठाशी माझं स्वतःचं अतूट नातं आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी प्राथमिकता असलीच पाहिजे आणि केंद्र शासनाने त्याला प्राथमिकता दिले आहे. मला केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली.तेव्हाही आणि आताही माझा सर्वाधिक निधी मी शिक्षणावर खर्च करत आहे.

विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये राहणे यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही. विद्यापीठात वसतिगृह बांधल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी या वसतीगृहात राहून शिक्षण घेता येणार आहे. विद्यापीठ बाहेर वाहनांचा आवाज आणि इतर घुंगट यामुळे अभ्यासात मन लागत नाही. त्या तुलनेत विद्यापीठात शांतता असून अभ्यासाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाबाहेर राहणे हे महागडे आहे. विद्यापीठाच्या आवारातील वसतिगृहामध्ये तुलनेने कमी शुल्क आहे. त्यामुळेअशा ठिकाणी मदत करणे गरजेचे आहे, या भूमिकेतून मी खासदार निधीमधील सर्वाधिक निधी रेकमेंड केला आहे. सध्या 280 आणि पुढील काळात आणखी 280 अशा 560 विद्यार्थिनींच्या राहण्याची व्यवस्था येथे होणार आहे,असेही जावडेकर यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वासतीगृहाच्या आवारात आणखी एक नवे वसतीगृह बांधले जाणार असून या वासतीगृहाचे भूमिपूजन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जावडेकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र शिंगणापूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, मुख्य वसतिगृह प्रमुख डॉ. वर्षा वानखडे यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.