विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे ? काय झाले नवे बदल... 

विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे ? काय झाले नवे बदल... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) प्रभारी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वी कार्यरत असलेल्या असोसिएट अधिष्ठाता (Associate Dean)यांच्याकडे तात्पूर्त्या स्वरूपात देण्यात आला आहे.परिणामी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजाला अधिक गती मिळेल,असे बोलले जात आहे.तसेच पुढील काही महिन्यात पूर्णवेळ अधिष्ठाता पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.त्यामुळे सध्या असोसिएट अधिष्ठाता म्हणून काम पाहणाऱ्या प्राध्यापकांकडेच अतिरिक्त कार्यभार दिला आहे. 

पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्याकडे वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचा अतिरिक्त कार्यभार होता.तसेच नुकतीच नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झालेले डॉ.एम.जी.चासकर यांच्याकडे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी होती.त्याचाप्रमाणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दीपक माने हे आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळत होते.नुकतेचे माने हे सेवानिवृत्त झाले आहेत.त्यामुळे या तीनही विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदाची अतिरिक्त जबाबदारी इतरांकडे देण्याबाबत विद्यापीठ पातळीवर विचार केला जात होता.अखेर पूर्वीपासून असोसिएट अधिष्ठाता या पदावर काम करणाऱ्या प्राध्यापकांकडे ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : विद्यापीठाच्या परीक्षांसाठी आता पुरवणी मिळणार नाही

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या असोसिएट अधिष्ठातापदी डॉ.यशोधन मिठारे कार्यरत होते.आता त्यांच्याचकडे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदाची अतिरिक्त जबाबदारी पूर्वी असोसिएट अधिष्ठाता म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. प्रमोद पाटील यांच्याकडे दिली आहे.तर डॉ.दीपक माने यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार मानव्य विज्ञान विद्याशाखेचे असोसिएट अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.