फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी सेवानिवृत्त

डॉ. परदेशी यांनी २००९ पासून सलग चौदा वर्षे फर्ग्युसनचे प्राचार्य म्हणून धुरा सांभाळली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून त्यांनी सन २००० पासून योगदान दिले.

फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी सेवानिवृत्त

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी शुक्रवारी (दि.३०) सेवानिवृत्त झाले.डॉ. परदेशी यांनी ३९ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी भूगर्भशास्त्र विषयात संशोधन केले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदा, कार्यशाळा आणि परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला.

डॉ. परदेशी यांनी २००९ पासून सलग चौदा वर्षे फर्ग्युसनचे प्राचार्य म्हणून धुरा सांभाळली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून त्यांनी सन २००० पासून योगदान दिले. त्यांच्या कारकिर्दीत फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायतत्ता आणि तीन वेळा नॅकची 'ए' श्रेणी मिळाली. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले.

फर्ग्युसन महाविद्यालयात शुक्रवारी सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते डॉ. परदेशी आणि त्यांच्या पत्नी मंजुश्री यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय स्थानिक विकास समितीचे अध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

"वैभवशाली परंपरा आणि वारसा असणाऱ्या फर्ग्युसन साठी सेवा करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. फर्ग्युसन मध्ये काम करण्याची भावना नव्हती, तर तो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. माझ्या यशात सहकार्याचा वाटा मोठा होता."

- प्राचार्य , डॉ. रविंद्रसिंग परदेशी,फर्ग्युसन महाविद्यालय

-------------

"परदेशी सरांनी अवघड जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले. निर्णय क्षमतेतून विश्वास संपादन केला. समाजातील स्थान उंचावले."

-डॉ. शरद कुंटे ,अध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी