विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांचा सवाल

सर्व विद्यार्थ्यांना फेलोशीपा द्यावी,अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांचा सवाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

संशोधनाच्या माध्यमातून काही नवीन गोष्टींचा शोध लावावा.तसेच उच्च शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी परदेशात जावे किंवा चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी, या आशेने अनेक विद्यार्थी पीएच.डी. (PHD) साठी प्रवेश घेतात.त्यासाठी शासनाकडून सारथी संस्थेतर्फे (Sarathi Sanstha) फेलोशिप दिली जाते.मात्र,विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवे लावणार आहेत ? असा  सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावार (AJIT PWAR) यांनी मंगळवारी विधान परिषदेत उपस्थित केला.त्यामुळे अनेक सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

हेही वाचा : शिक्षक भरती रखडण्याचे खरे कारण आले समोर ; जाहिरातीसाठी आणखी काही दिवस थांबावे लागणार
 
सारथीच्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी फेलोशीपा मिळावी, याबाबत सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला.सारथीने जाहिरात प्रसिध्द केली त्यावेळी किती विद्यार्थ्यांना फेलोशीप दिली जाईल, याबाबत कोणतीही अट टाकली नव्हती.मात्र, तब्बल सहा महिन्यांनी 200 विद्यार्थ्यांना फेलोशीपा दिली जाईल,असे जाहीर करण्यात आले.तोपर्यंत 1 हजार 329 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशीपा द्यावी,अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.त्यावर विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवे लावणार आहेत,असा उलट सवाल अजित पवार यांनी सतेज पाटील यांना विचारला. 

सतेज पाटील म्हणाले,बार्टी , सारथी संस्थांच्या माध्यमातून राज्यात पीएच.डी धारकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे फायदाच होणार आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांना फेलोशीपा न देता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशीपा द्यावी. 200 फेलोशीपाची अट पुढील वर्षांपासून लागू करावी.

 अजित पवार म्हणाले, सारथी ,महाज्योती , बार्टी आदी संस्थांमधून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते.परंतु,मंत्री मंडळामध्ये यावरच चर्चा झाली. एवढ्या विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी शिष्यवृत्तीची आवश्यकता आहे का ? यावर चर्चा करण्यात आली.त्यासाठी एक समिती स्थापना करण्यात आली. त्यानुसार आता सारथीसाठी 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बाबत फेर विचार केला जाईल. परंतु, मागणी मान्य होईलच असे सांगणार नाही. गरज असेल तर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.तसेच फेलोशीपाच्या एवजी आता विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करावेत.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी चांगले मार्गदर्शन दिले जात आहे.त्यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगली कामगिरी करता आहेत.तसेच विद्यार्थ्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यात वसतीगृह उभारणीचे काम सुरू आहे.