शिक्षक भरती रखडण्याचे खरे कारण आले समोर ; जाहिरातीसाठी आणखी काही दिवस थांबावे लागणार 

आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्व जिल्ह्यातील शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार

शिक्षक भरती रखडण्याचे खरे कारण आले समोर ; जाहिरातीसाठी आणखी काही दिवस थांबावे लागणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीस विलंब ( Delay in recruitment of teachers) होत असल्याचे कारण समोर आले असून भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी (Teacher Recruitment Advertisements) आणखी आठ ते दहा दिवस वाट पाहावी लागणार आहे. सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची (Inter-district transfer of teachers) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्व जिल्ह्यातील शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे शिक्षक भरतीस विलंब होत असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली.मात्र, त्यांनी सांगितलेल्या कालावधीत भारतीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. पात्र उमेदवार भरतीच्या जाहिरातीकडे डोळे लावून बसले आहेत.मात्र,रोष्टर तपासणी, आरक्षण तपासणी आदी कारणांमुळे ही भरती लांबत चालली आहे. शासनाने भरती लवकर सुरू करावी, या मागणीसाठी इच्छुक उमेदवारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी धरणे आंदोलन व उपोषण केले.एका उमेदवार तरुणीचा भरतीच्या जाहिराती वरून केसरकर यांच्याशी झालेला वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला.विधानसभेतही शिक्षक भरतीची जाहिरात का प्रसिद्ध केली जात नाही, यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.त्यावर जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर केसरकर यांनी दिले.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील दिला.त्यानुसार ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज करण्याची संधी देण्यात आली.तसेच २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते.परंतु, ही प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक अंतरजिल्हा बदली मिळण्यास पात्र असूनही रिक्त जागेआभावी त्यांना बदली मिळाली नव्हती, अशा शिक्षकांना २०२२ मध्ये भरलेला अर्ज एडिट करण्याची संधी देण्यात आली आहे.त्यामुळे सध्या ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही तोपर्यंत शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार नाही.

बदलीसाठी आणि भरतीसाठी वापरले जाणारे रोष्टर एकच असते. कोणत्या शाळेत व जिल्ह्यात कोणत्या संवर्गातील किती जागा रिक्त आहेत याची माहिती या रोष्टरवरूनच कळते.त्यामुळे आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त जागांची अचूक माहिती समोर येणार आहे.त्यामुळे शिक्षण विभागाने भरतीची सर्व तयारी पूर्ण केली असली तरी ग्रामविकास विभागाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.