विद्यापीठ की शैक्षणिक कसाईखाना; विद्यार्थ्यांचा सवाल
पीडित विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी न्यायपूर्ण पुनर्मूल्यांकन करून परत निकाल लावण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनासमोर त्यांनी केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या (Sant Gadge Baba Amravati University) विद्यार्थ्यांबाबत (students) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. औषधनिर्माण शास्त्र शाखेच्या (Faculty of Pharmacology) सातव्या सत्रातील फार्मसी प्रॅक्टिस व पाचव्या सत्रातील फार्मासिटिकल जुरीसप्रुडन्स या विषयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अपवादात्मकरीत्या अगदी कमी गुण (Many students have exceptionally low scores.) मिळाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ०,३,७ गुण मिळाले असून इतर विषयांमध्ये या सत्राच्या विद्यार्थ्यांना समाधानकारक गुण आहेत. याच संबंधित विषयाचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून पुनर्मुल्यांकनाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, याचाही निकाल निवेदन देऊन सुद्धा अत्यंत उशिरा लागल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस निवडीमध्ये अपात्र ठरवण्यात आले आहे.
औषध निर्माण शाखेतील एका क्रमाने बसणारे ७० विद्यार्थी अनुउतीर्ण
वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी यवतमाळ येथील औषध निर्माण शाखेतील एका क्रमाने बसणारे ७० विद्यार्थी सातव्या सत्रातील एकाच विषयामध्ये (फार्मसी प्रॅक्टिस यामध्ये) अनुत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे हा विषय सोडता इतर विषयांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट गुण मिळाले असून याच विषयांमध्ये सर्व संबंधित ७० विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले.
विद्यार्थ्यांकडे पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित विषय पुनर्मूल्यांकनासाठी सादर केला व यासोबतच परीक्षा संचालक यांना निकाल लवकर लावण्यासाठी लेखी निवेदन दिले. परंतु, त्याचा कुठलाही फायदा झाला नाही आणि सर्व विद्यार्थी कॅम्पस निवडीसाठी अपात्र ठरले,असेही काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कोणतीही चूक नसताना मूल्यांकनकर्त्यांच्या हलगर्जीमुळे विद्यार्थ्यांना नैराश्याच्या दरीत लोटण्याचं व पुनर्मूल्यांकनाच्या माध्यमातून पैसा लुटण्याचे काम विद्यापीठाकडून होत असल्याचा आरोप विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश सोळंके यांनी केला आहे. यासोबतच या पीडित विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी न्यायपूर्ण पुनर्मूल्यांकन करून परत निकाल लावण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनासमोर त्यांनी केली आहे.
याप्रकरणी योगेश सोळंके यांनी मा. कुलगुरू मिलिंद बाराहाते यांच्यासमोर झालेला गैरप्रकार सविस्तर पुराव्यानिशी मांडला असता प्रथमदर्शनी पाहता काहीतरी घोळ झाल्याचे कुलगुरूंनीही मान्य करत अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्राथमिक तपासणी करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे. पुढील काळात चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या बैठकीस विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद बाराहाते, परीक्षा संचालक नितीन कोळी, कुलसचिव अविनाश असणारे, उपकुलसचिव मोनाली तोटे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख योगेश सोळंके, प्रथमेश नवरखेले, बलराज वाकोडे, इम्रान सय्यद, कार्तिक डकरे, वेदांत दांडगे, हर्ष धोटे, ऋषिकेश हिंगणकर, योगेश डहाके, गणेश निंभोरकर इतर पदाधिकारी व वाधवानी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
eduvarta@gmail.com