उन्हाळ्यामुळे राज्यातल्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी / शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असण्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याबाबत राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 तर माध्यमिक शाळा सकाळी 7 ते 11:45 या वेळेत घ्याव्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उन्हाच्या झळा वाढल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करावा, अशा मागणीची निवेदने विविध संघटनांकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाली.तसेच काही जिल्ह्यांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याबाबत आदेश निर्गमित केले. परंतु, सर्व जिल्ह्यांमध्ये शाळांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असण्यासाठी राज्यातील सर्व शाळा शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार भराव्यात, असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी / शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असण्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, पातळ, सैल , सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे विद्यार्थ्यांनी घालावेत. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा. उन्हाळ्यात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी. उन्हात बाहेर पडणे टाळावे असे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
------------------------------------------
उन्हाळ्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात घेण्याबाबत शासनाकडून आदेश काढला जातो. मात्र, सत्र परीक्षा व पॅट परीक्षा उन्हाळा अधिक कडक होत जातो, अशा दिवसात घेण्याचा अट्टहास शिक्षण विभागाकडून घेतला जातो.शिक्षण विभागाची ही दुटप्पी भूमिका हास्यास्पद आहे.त्यामुळे आपण केव्हा काय निर्णय घेतो, याचा शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार करावा.
- कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना


eduvarta@gmail.com