दोन महाविद्यालयीन तरूणांवर कोयत्याने सपासप वार..; मैत्रिणीबद्दल अफवा पसरवण्याचा संशय

मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोन तरुणांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून एक जण किरकोळ जखमी आहे. 

दोन महाविद्यालयीन तरूणांवर कोयत्याने सपासप वार..; मैत्रिणीबद्दल अफवा पसरवण्याचा संशय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे शहरातील अतिवर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गरवारे महाविद्यालयाजवळ (Pune FC Road Garware College Crime) भरदिवसा दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार (College students attacked with sickles) करण्यात आले . मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोन तरुणांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून एक जण किरकोळ जखमी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जखमी तरुण आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आरोपीची मैत्रीण आणि जखमी तरुण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. महाविद्यालयात जखमी तरुण आरोपीच्या मैत्रिणीसोबत बोलत होता. यावेळी या तरुणीने माझ्या विषयी अफवा पसरवतो का? असे म्हणत झालेला प्रकार आपल्या आरोपी मित्राला सांगितला. त्यानंतर आरोपीने आपल्या काही मित्रांना बोलावून घेतले आणि हातात कोयते घेऊन त्यांनी जखमी तरुणाचा पाठलाग सुरू केला. गरवारे महाविद्यालयासमोर आरोपी हातात कोयते घेऊन त्या तरुणांचा पाठलाग करत होते. भर दुपारी आणि गर्दीच्या वेळी हा संपूर्ण प्रकार घडल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. 

दरम्यान, आरोपींनी जखमी तरुण आणि त्याच्या भावाला संजीवनी हॉस्पिटलजवळ गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली . त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोयत्याने वार केल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. डेक्कन पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र भर वर्दळीच्या ठिकाणी महाविद्यालयालगत हा संपूर्ण प्रकार घडल्याने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.