शिक्षणाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक गमावला!

डॉ. ताकवले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शिक्षणाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक गमावल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

शिक्षणाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक गमावला!
Dr. Ram Takawale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. राम ताकवले (Dr. Ram Takawale) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. ताकवले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शिक्षणाला (Education) नवी दिशा देणारा मार्गदर्शक गमावल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

डॉ. ताकवले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डॉ. ताकवले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य मोलाचे आहे. शिक्षणाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक आपण गमावला आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून एक आदर्श शिक्षण पद्धती निर्माण करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून नेहमीच मिळत होती. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच ताकवले कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

शैक्षणिक घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही डॉ. ताकवले यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, राज्यासह देशपातळीवरील शिक्षण क्षेत्रात मौलिक कामगिरी बजावणारे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या निधानाची बातमी मनाला धक्का देणारी आहे. प्रतिकुल परिस्थितीतून पुरंदर तालुक्याच्या हरगुडे गावापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज थांबला.

डॉ. ताकवले यांनी घडवलेले विद्यार्थी आज जगात अनेक ठिकाणी यशोशिखरावर पोहचले आहेत. डॉ. राम ताकवले यांचे निधन हे राज्य आणि देशापातळीवरील शिक्षण क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याचे सांगत पवार यांनी श्रध्दांजली वाहिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले की, डॉ. राम ताकवले सरांच्या निधनाने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मौलिक कार्य करणारे, राज्याच्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे महान व्यक्तिमत्व हरपले आहे. उच्च शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा उंचावण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या युवकांना, ज्येष्ठांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी, राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका सरांनी बजावली. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. डॉ. ताकवले सरांचे निधन ही राज्याच्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी असल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2