ग्रामीण भागात साकारलीय राज्यातील पहिली अंतराळ प्रयोगशाळा

इस्रोच्या आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमा, इस्रोकडून तयार करण्यात आलेले पान, उपग्रह प्रक्षेपक याची सविस्तर माहिती खऱ्याखुऱ्या मोहल्सद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

ग्रामीण भागात साकारलीय राज्यातील पहिली अंतराळ प्रयोगशाळा
Space Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अंतराळाबाबत (Space) लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता असते. पण पाठ्यपुस्तके आणि चित्रपटांतूनच त्याचे दर्शन घडते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी बहुतेकांना मिळत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील मुले त्यापासून नेहमीच वंचित राहतात. याच उद्देशाने मुळशीतील (Mulshi) ग्रामीण भागात महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिली अंतराळ प्रयोगशाळा (Space Laboratory) उभी राहिली आहे. प्रयोगशाळेमध्ये दोनशेहून अधिक उपकरणांच्या मदतीने अंतराळाविषयीचे कुतुहूल उलगडणार आहे.  

मुळशी तालुक्यातील हेरीटेज इंटरनॅशनल स्कूल (Heritage International School) या शाळेने अंतराळ प्रयोगशाळा उभारली आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) या संस्थेच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पे अकॅडमीच्या सहकार्याने प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. इस्रोच्या आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमा, इस्रोकडून तयार करण्यात आलेले पान, उपग्रह प्रक्षेपक याची सविस्तर माहिती खऱ्याखुऱ्या मोहल्सद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्यांसाठी साकारली जाणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच प्रयोगशाळा असेल.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

अकॅडमीचे संस्थापक गोविंद यादव व सल्लागार समितीचे सदस्य डॉ प्रतिक मुणगेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शाळेचे संचालक कुणाल भिलारे, प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे व प्राचार्या रेणू पाटील उपस्थित होते. प्रयोगशाळेचे उद्घाटन शुक्रवारी (२१ एप्रिल) रोजी मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथे सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व इस्त्रोचे अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. टी. एन. सुरेशकुमार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

या प्रयोगशाळेत एसएलव्ही ३ एएसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही डी १, जीएसएलव्ही एमके ३, एसएसएलव्ही या प्रक्षेपकांसोबतच चांद्रयान १, मंगलयान १ या यानांच्या खऱ्याखुऱ्या प्रतिकृती पाहता आणि त्यांचा अभ्यास करायला मिळणार आहे. याशिवाय इस्रोने तयार केलेली पुष्पकयान, गरूड विमान, गगन विमान ही छोट्या आकाराची विमानेही पहायला मिळतील. विशेष म्हणजे रिमोटच्या सहाय्याने ही विमाने उडवण्याची प्रात्यक्षिकेही कार्यक्रमाच्या वेळी दाखवण्यात येणार आहेत.

प्रयोगशाळेत दोन दुर्बिणी (टेलिस्कोप) ठेवण्यात आल्या असून त्याद्वारे अंतराळातील विविध घटना पाहून त्यांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय प्रयोगशाळेत रोबोट किट, लाइट फॉलोइंग किट, ब्लुटूथ कंट्रोल रोबोट, क्वाडकॉप्टर ड्रोन इत्याही गोष्टीही पहायला मिळतील. प्रयोगशाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवणार आहेत. इस्त्रोचे वैज्ञानिक प्रत्यक्ष प्रयोगशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसह विविध प्रयोग करतील व त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे मुणगेकर यांनी सांगितले.