पुणे नाशिक रेल्वेमुळे जीएमआरटीचे कमीत कमी नुकसान व्हावे

GMRT, pune-nashik train route, naralikar

पुणे नाशिक रेल्वेमुळे जीएमआरटीचे कमीत कमी नुकसान व्हावे

पुणे: जयंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी- GMRT) या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाला पुणे नाशिक रेल्वे मार्गामुळे कमीत कमी हानी व्हावी. त्यासाठी शास्त्रज्ञ आणि प्रशासनाने एकत्र बसून मार्ग शोधावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली आहे.
   ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी व्हिडिओ खगोलशास्त्रीय वेधशाळा 1990 च्या दशकात पुण्यात उभारण्यात आले. जीएमआरटी मुळेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतर्गत निर्माण होणारे आंतरविद्याशाखीय खगोल आणि खगोल भौतिक केंद्र अर्थात (आयुका) पुण्यात उभारण्याचा निर्णय डॉ.नारळीकर यांनी घेतला. जी एम आर टी मध्ये अनेक वर्ष विश्वाचा अभ्यास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या वेधशाळेचा पुरेपूर फायदा करून घेणे गरजेचे आहे. हवाई बेटांवर सर्वाधिक उंचीवर असलेल्या जागेवर जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप बांधायला सुरुवात झाली होती. मात्र त्या ठिकाणी स्थानिक आदिवासींचे पवित्र स्थान असल्याने तिथे कोणालाही जाण्यास आदिवासींनी विरोध केला होता. मात्र पुढील काळात त्यातून वेगळा मार्ग काढण्यात आला होता. त्याचपद्धतीने रेल्वे मार्ग पूर्ण व्हावा आणि 'जीएमआरटी'ला कमीत कमी नुकसान व्हावे, असा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
  पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पामुळे स्थानिक भागातील उद्योगांना दळणवळणाची सुविधा मिळणार आहे नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकल्पाबाबत बैठक झाली असून त्यास हिरवा कंदील मिळाला आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी आणि उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.