CET CELL कडून यंदा प्रथमच ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा सुरू ; वाचा सविस्तर माहिती   

या यंत्रणेच्या सहाय्याने संबंधित आक्षेप, हरकत नोंदविणाऱ्यांना आक्षेपांवर काय कार्यवाही झाली, याची माहिती देखील तपासता येणार आहे.

CET CELL कडून यंदा प्रथमच ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा सुरू ; वाचा सविस्तर माहिती   

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे  विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या (Graduate And Post Graduate Course) प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. मात्र यंदा प्रथमच ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ (Objection Tracker)ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या सहाय्याने संबंधित आक्षेप, हरकत नोंदविणाऱ्यांना आक्षेपांवर काय कार्यवाही झाली, याची माहिती देखील तपासता येणार आहे. मात्र, या हरकती नोंदविण्यासाठी संबंधित उमेदवारांना शुल्क द्यावे लागणार आहे.

या यंत्रणेअंतर्गत विविध प्रवेश परीक्षांच्या सीईटी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवर आणि उत्तरसूचींवर आक्षेप आणि हरकती नोंदविण्याचे वेळापत्रक दिले आहे. आता या संदर्भातील सार्वजनिक माहिती सीईटी सेलने ‘https://cetcell.mahacet.org’ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची नोंदणी करताना वापरलेल्या लॉगिनद्वारेच आक्षेप-हरकती नोंदविता येणार आहेत, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेदरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरसूची, यावर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा विकसित केली असून ती यंदा प्रथमच खुली करण्यात आली आहे. 

परीक्षांच्या दरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची यावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना आक्षेप, हरकती नोंदविता येतात. त्यासाठी आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी परीक्षानिहाय स्वतंत्र कालावधी देण्यात येईल. त्या कालावधीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार असल्याचे सीईटी सेलने सांगितले आहे.