आसामच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अस्सल मराठमोळ्या संस्कृतीची झलक

‘युवा संगम’च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी या आसामी पाहुण्यांनी अस्सल मराठमोळ्या संस्कृतीची झलक अनुभवली.

आसामच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अस्सल मराठमोळ्या संस्कृतीची झलक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

‘युवा संगम’ (Yuva Sangam) सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत आसामवरून (Assam) महाराष्ट्रात आलेल्या ५० विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाद्वारे ‘युवा संगम’च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी या आसामी पाहुण्यांनी अस्सल मराठमोळ्या संस्कृतीची झलक अनुभवली.

 ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियानांतर्गत यंदा ‘युवा संगम’ उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन देशभरात केले जात आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांमधील निवडक विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत राज्यभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आसाममधील विद्यार्थ्यांचा संघ रविवारी पुण्यात दाखल झाला. पुणे विद्यापीठाने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत आणि पुढील आठवडाभराच्या कार्यक्रमाचे नियोजन जाणून घेतल्यानंतर, आयोजक पुणे विद्यापीठाने या उपक्रमाची जय्यत तयारी केल्याचेच रविवारी सर्व सहभागी पाहुण्या विद्यार्थ्यांनी अनुभवले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या एका विशेष समारंभामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. संदीप पालवे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले आदी  या वेळी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील आठवडाभराच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.