शेतकऱ्याच्या मुलाच्या हाती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय १० एप्रिल २०२५ पासून पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्या बाबतची औपचारिकता आज पूर्ण झाली. ९९, १०० आणि १०१ वे अशी तीन ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळेल तेव्हा प्रा. मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, सुनिताराजे पवार या कार्यवाह आणि विनोद कुलकर्णी हे कोषाध्यक्ष असतील.

शेतकऱ्याच्या मुलाच्या हाती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा 

शेतकऱ्याच्या मुलाच्या हाती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे (All India Marathi Literature Corporation) कार्यालय १० एप्रिल २०२५ पासून पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्या बाबतची औपचारिकता आज पूर्ण झाली. ९९, १०० आणि १०१ वे अशी तीन ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळेल तेव्हा प्रा. मिलिंद जोशी (Prof. Milind Joshi) हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, सुनिताराजे पवार या कार्यवाह आणि विनोद कुलकर्णी हे कोषाध्यक्ष असतील. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील माणकेश्वर या ८०० लोकवस्तीच्या दुष्काळी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक तरुण कराडच्या गवर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअर झाला. तीस वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी, एक सुटकेस, ५०० रुपये आणि इथल्या सांस्कृतिक क्षेत्रात काही करायचे आहे अशी स्वप्ने घेऊन पुण्यात आला.

दोन महिने शोधाशोध करूनही या तरुणाला कॉट बेसिसवर राहण्यासाठी पुण्यात रूम देखील मिळाली नाही. एका हॉस्टेलवर मित्राच्या रूममध्ये पॅरासाईट म्हणून राहावे लागले. त्या वेळी एक दोन परिचित सोडले तर या मुलाच्या परिचयाचे पुण्यात कोणाही कोणीही नव्हते. कसलीही कौटुंबिक, आर्थिक पार्श्वभूमी आणि गॉडफादर नसताना प्रचंड संघर्ष करत हा तरुण केवळ प्रतिभा, अभ्यास, व्यासंग, ध्येय, ध्यास, सकारात्मकता आणि गुणवत्तेच्या बळावर उभा राहिला. बघता बघता महाराष्ट्रातील नामवंत लेखक आणि वक्ता झाला. व्याख्यानाच्या निमित्ताने महाराष्ट्रात, भारतभर आणि अनेक देशात फिरला. महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यवाह, प्रमुख कार्यवाह, कार्याध्यक्ष या पदापर्यंत पोचला. वयाच्या ४३व्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेचा कार्याध्यक्ष होण्याचा मान त्यांना साहित्य रसिकांनी दिला तेव्हा Youngest President of the Oldest Institute अशा मथळ्याच्या बातम्या इंग्रजी वृत्तपत्रांनी दिल्या होत्या. वयाच्या ५३ व्या वर्षी ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भूषवित आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या इतिहासातील ते सर्वात तरुण अध्यक्ष असतील. या त्यांच्या प्रवासात भारती विद्यापीठाने त्यांना नेहमीच उत्तेजन आणि खंबीर पाठिंबा दिला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होताच त्यांनी साहित्य परिषदेची कार्यसंस्कृती बदलून टाकली. सदाशिव पेठेत अडकलेली साहित्य परिषद गाव शिवारापर्यंत पोचवली. कार्यक्रमांचे स्वरुप बदलले. परिषदेच्या वर्धापन दिनासाठी इतर भाषेतील प्रतिभा राय, वैदेही, अशोक वाजपेयी, सीतांशु यशचंद्र, सूर्यबाला, डॉ रामचंद्र गुहा, डॉ माधव कौशिक अशा दिग्गज प्रतिभावंतांना आमंत्रित करुन बौध्दिक मेजवानी देणारे नेटके कार्यक्रम आयोजित केले. कार्याध्यक्ष म्हणून जोशींनी जेवढा संघर्ष केला, संकटांचा सामना केला तेवढा आजवर कोणत्याही कार्याध्यक्षाला करावा लागला नसेल. कोरोनाच्या संकट काळात संस्थेला प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि प्रसंगी पदरचे पैसे घालून पदाधिकाऱ्यांनी संस्था चालवली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे तांडव सुरु असताना निवडणुका घेणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत घटनेला अनुसरून आणि कायदेशीर सल्ला घेऊन वार्षिक सर्वसाधारण सभेला सामोरे जाण्याचा त्यांचा निर्णय वादळी ठरला, खूप टीका झाली तरी वार्षिक सर्वसाधारण सभेचे महत्व या निमित्ताने सर्वांना समजले आणि वार्षिक सर्वसाधारण सभा हा केवळ उपचार नाही हे पटवून देण्यात प्रा. मिलिंद जोशी यशस्वी ठरले. त्यांच्या जागी दुसरे कोणीही कार्याध्यक्ष असते तरी त्यांनाही त्या परिस्थितीत हाच निर्णय घ्यावा लागला असता.

प्रा. जोशी यांनी तो मोठ्या धीराने घेतला हे त्यांचे धाडस कौतुकास्पदच आहे. याच काळात जीवाला जीव देणारे प्रकाश पायगुडे, उद्धव कानडे आणि दीपक करंदीकर हे तीन साथीदार देवाघरी गेले. त्यातून सावरत त्यांनी परिषदेचा गाडा नुसता पूर्वपदावर आणला नाही तर मोठी झेप घेतली. स्वप्नवत वाटावे असे आणि ज्याची गेली ३५ वर्षे नुसती चर्चा सुरु होती पण कोणत्याही कार्याध्यक्षाला जमले नव्हते असे साहित्य परिषदेचे अतिशय देखणे अंतर्गत नूतनीकरण परिषदेच्या विश्वस्तांच्या सहकार्यामुळे त्यांच्याच कार्यकाळात घडले. साहित्य रसिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली साहित्य परिषदेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटना बदलण्यासाठी आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकी ऐवजी सन्मानाने देण्यासाठी पुढाकार घेतला त्याला यश आले. निवडणुकीच्या दलदलीत न उतरणारे डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर , भारत सासणे, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. तारा भवाळकर असे मान्यवर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यांच्याच व्यापक दृष्टीकोनामुळे आणि गुणग्राहक वृत्तीमुळे ग्रामीण भागातील अनेक लेखक कवींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मोठे व्यासपीठ मिळाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्य परिषदेने उभ्या केलेल्या लोकचळवळीचे नेतृत्व त्यांनी केले आणि त्यासाठी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले.

मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी त्यांच्याच नेतृत्वाखाली साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आणि त्या साठीच्या सगळ्या बैठका परिषदेत पार पडल्या. त्यालाही यश आले. महाराष्ट्र साहित्य पत्रिका या साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठित मुखपत्रातील गेल्या शंभर वर्षातील निवडक लेखांचे संकलन असणारा अक्षरधन हा डॉ. नीलिमा गुंडी यांनी संपादित केलेला अनमोल ग्रंथ त्यांच्याच कार्यकाळात साकारला. पूर्वी साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळावर काम करणारे जिल्हा प्रतिनिधी फक्त भोजन आणि भत्ता यासाठीच येतात अशी प्रतिमा पुण्यातल्या पदाधिकारी मंडळींनी निर्माण केली होती. प्रा. जोशी यांनी जिल्हा प्रतिनिधीना कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करुन दिली. प्रा. जोशी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मोठ्या हुशारीने आणि कौशल्याने परिषदेतील अंतर्गत राजकारण मोडून काढले. त्यांच्या कार्यकाळात कार्यकारी मंडळात होणाऱ्या सगळ्या निवडी बिनविरोध झाल्या. एका बैठकीत सात सात निवडी बिनविरोध करण्यात ते यशस्वी ठरले हा परिषदेच्या इतिहासातील विक्रमच म्हणावा लागेल. त्यांच्या काळात एकाही सहकाऱ्याला त्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा द्यावा लागला नाही, बदनाम होऊन किंवा अपमान झाला म्हणून बाहेर पडावे लागले नाही हीच त्यांच्या चांगल्या कामाची पावती. कार्यकारी मंडळात वयाने खूप ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी जोशींना नेहमीच खंबीर पाठिंबा दिला कारण कोणत्याही गोष्टीत त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही आणि हेतू शुद्ध आहे हे त्यांच्या लक्षात आले. सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना समान संधी देऊन त्यांनी गेली साडेनऊ वर्षे उत्तम काम केले. अनेक वर्षे रखडलेली परिषदेची घटना दुरुस्ती मार्गी लावणे म्हणजे अंगावर वादळे ओढवून घेणेच. या माणसाने ती सगळी वादळे नुसती ओढवून घेतली नाहीत तर तितक्याच वेगाने परतवून लावली आणि घटना दुरुस्तीसारखा अवघड विषय मार्गी लावला.

वार्षिक सर्वसाधारण सभेने प्रा. जोशी यांना नेहमीच खंबीर साथ दिली कारण हा माणूस संस्थेच्या हिताचेच निर्णय घेणार याची सदस्यांना असलेली खात्री. म्हणून तर विरोधाला विरोध करणारे वार्षिक सभेत नेहमीच पराभूत झाले. महाराष्ट्रासह पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात एकही महत्वाचा कार्यक्रम प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थिती शिवाय पार पडत नाही ही या माणसाच्या प्रेमाची, प्रतिभेची आणि अभ्यासाची कमाई . साहित्य परिषद असो की साहित्य महामंडळ ठाम भूमिका घ्यायची आणि त्यासाठी किंमत मोजायची तयारी ठेवायची पण मागे हटायचे नाही हा यांचा खाक्या आहे. प्रा. मिलिंद जोशी यांचे चांगले काम न बघवल्यामुळे पोटदुखी झालेल्या आणि गुणवत्तेचा द्वेष करणाऱ्या काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांच्या विरोधात कितीही कटकारस्थाने केली, विरोधासाठी विरोध केला, सर्व प्रकारे त्रास दिला, हातपाय तोडण्याची भाषा केली, धमक्या दिल्या, खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केली, टीका केली तरीही आपला संयम आणि शब्दांचा तोल ढळू न देता खंबीरपणे परिस्थिती हाताळणारा आणि केवळ गुणवत्ता कामाच्या जोरावर जो सर्वांना पुरून उरला असा खंबीर, खमक्या, धडाकेबाज , डाऊन टू अर्थ, नात्यांना महत्व देणारा, मातीशी नाळ असणारा , साधेपणा जपणारा शेतकऱ्याचा मुलगा आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतोय याचा आनंद माझ्याप्रमाणेच तमाम साहित्यविश्वाला झाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घडी गेल्या काही वर्षात विस्कटली आहे. रसिक संमेलनापासून दूर जात आहेत.

संयोजकांनी केलेले केवळ स्वतःचे ब्रॅण्डिंग, त्यासाठी कोणत्याही थराला जाणे, साहित्यबाह्य लोकांचा संमेलनातील वाढता सहभाग, साहित्य महामंडळाचा सुटत चाललेला अंकुश, राजकारण्यांचा अकारण वाढता वावर आणि रटाळ कार्यक्रम यामुळे लोकं संमेलनापासून दूर जात आहेत. या सर्व आव्हानांचा सामना करुन संमेलनाला गत वैभव प्राप्त करुन देण्याचे कठीण काम अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आल्यानंतर अध्यक्ष या नात्याने प्रा. मिलिंद जोशी यांना करावे लागणार आहे. त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली निश्चित काही परिवर्तन आपल्याला बघायला मिळेल अशी मला खात्री आहे. त्यांना खंबीर साथ देण्यासाठी कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष म्हणून मी समर्थ आहोत. सुनिताराजे पवार या देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील आहेत. खुरपण ते प्रकाशन अशी त्यांची अभिमानास्पद वाटचाल झालेली आहे. पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मी देखील शून्यातून माझे आयुष्य घडविले आहे. बँकिंग, पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रात भरीव काम केले आहे.

सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्र पाठविण्याचा उपक्रम आणि दिल्लीतील धरणे आंदोलनाचे नियोजन, कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे येथील घराचे नूतनीकरण आणि स्मारकात रूपांतर, महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरू करुन तो दिमाखात साजरा करण्याचा उपक्रम, रहिमतपूर येथील साहित्य परिषदेच्या शाखेस नाटककार वसंत कानेटकर यांचा पुतळा भेट देण्याचा उपक्रम अशा असंख्य उपक्रमांतून साहित्य परिषदेचे काम गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेली अनेक वर्षे करीत आहे. आम्ही तिघेही पदाधिकारी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कामकाज उत्तम करुन ९९, १०० आणि १०१ ही तीनही संमेलने ऐतिहासिक करु याची खात्री आहे. आजवर आपली खंबीर साथ तिघांना मिळाली आहे यापुढेही मिळेल याची खात्री आहे. 

सुनिताराजे पवार खुरपण ते प्रकाशन असा खडतर प्रवास करणारी, एका शेतकरी कुटुंबातील मुलगी, केवळ वाचनाच्या ओढीने, आवडीने प्रकाशन क्षेत्राची, अनवट अन् अनोळखी वाट निवडली. पुसेगावसारख्या छोट्या खेड्यातून येवून पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात प्रकाशन सुरु करणं खूपच धैर्याची आणि हिमतीची गोष्ट आहे. प्रकाशन क्षेत्रात फार कमी स्त्रिया कार्यरत आहेत, त्यातही वितरण क्षेत्रात तर कोणतीही स्त्री नाही. त्यामुळे हे वेगळेपण ठरले.राज्यसेवेत निवड होऊनही प्रकाशन क्षेत्र निवडलं. २००१ साली संस्कृती प्रकाशनाचा पाया घातला. आजपर्यंत ६०० पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११८ वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला कोषाध्यक्ष त्या ठरल्या. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. २०२३ पासून परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदाची धुरा त्या सांभाळत आहेत.

सासवडच्या २७वे आचार्य अत्रे संमेलनाचे अध्यक्षपद, मंगळवेढा येथे भरलेल्या तिसऱ्या साहित्य - संगीत संमेलनाचे अध्यक्षपद, अशा अनेक मानाच्या संस्थांचे अध्यक्षपद भूषविले आहे. स्वतःची आठ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील कांडा या कादंबरीला सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळात पाच वर्षे काम केले आहे. सध्या कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत. आता माझ्या स्वतःविषयी थोड़ेसे व्यक्त होतो. आत्मस्तुतीचा दोष पत्करून काही गोष्टी सांगतो. मी एक अतिशय सामान्य कुटुंबातून पूढे आलेले व्यक्तीमत्त्व आहे. कुटुंबाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना पत्रकारिता, सहकार, बँकींग, साहित्य या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा मी उमटवलेला आहे.

सातारा येथे खूप मोठे काम उभे केले आहे. साडेआठ कोटी रूपयांच्या तोट्यात असणाऱ्या बँकेचे नेतृत्व स्वीकारून सातारकरांची अर्थवाहिनी असलेली बँक वाचवून ती रिझर्व्ह बॅंकेच्या निकषाप्रमाणे आर्थिक सक्षम केली आहे. गुजराथी अर्बन सोसायटी, जिल्हा पतसंस्था फेडरेशन अशा संस्थांचे मी नेतृत्व करत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेत गेली १४ वर्षे मी काम करत आहे. शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मराठी भाषा दिन आणि पंधरवडा कार्यक्रम, सातारा साहित्य संमेलन, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या घराची उभारणी करून त्याचे स्मारकात रूपांतर केले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मोठा पुढाकार घेतला. पंतप्रधान यांना एक लाख पत्रे पाठवली. दिल्लीत धरणे आंदोलन केले आहे. नाटककार वसंत कानेटकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी योगदान दिले आहे. 'छोट्या बँकेची मोठी गोष्ट' पुस्तकाचा लेखक आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य आहे. शिवराज्याभिषेक समितीचा स्वागताध्यक्ष आहे. शिवसाहित्य संमेलनाचा कार्यवाह आहे. सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत कोषाध्यक्ष पदावर गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे. प्रा. मिलिंद जोशी यांचे पाठीराखे अशीही माझी एक ओळख आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचे काम अतिशय उत्कृष्ट करुन दाखवू, एवढीच ग्वाही मी देतो.

- विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे