अहमदनगर : वादग्रस्त प्राध्यापक भरतीवर सोमवारी कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी (दि.१६ ) होणार आहे.त्यात संस्थेतील प्राध्यापक भरतीबाबत चर्चा केली जाणार आहे.

अहमदनगर : वादग्रस्त प्राध्यापक भरतीवर सोमवारी कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वादग्रस्त प्राध्यापक भरतीमूळे (professor recruitment) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहिलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (Ahmednagar District Maratha Vidya Prasarak Samaj) संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी (दि.१६ ) होणार आहे.त्यात संस्थेतील प्राध्यापक भरतीबाबत चर्चा केली जाणार आहे. मात्र, सुरूवातीपासूनच भरती प्रक्रिया रद्द (Recruitment process canceled) करून नव्याने सर्व प्रक्रिया राबवण्याचा आग्रह कार्यकरिणीतील काही सदस्यांनी धरला आहे.त्यामुळे येत्या सोमवारी या विषयावर आता काय चर्चा होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा विद्यापीठात सुरू झाले NSS चे युनिट

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मागील कार्यकारणीच्या बैठकीत भरतीला मुदतवाढ घ्यावी,आशा स्वरूपाची चर्चा करण्यात आली.परंतु, पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झाला नाही.परिणामी संस्थेतील रिक्त जागांच्या भरतीसाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच मागील भरती प्रक्रियेत आपले सिलेक्शन झाले असेल; असे ज्यांना वाटते त्यांनी येथे निवड होईल,अशी आशा सोडून द्यायला हवी, असे कार्यकारिणीतील सदस्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. मात्र,यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

प्राध्यापक भरतीची पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करून संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी संस्थेच्याच सदस्यांनी करणे, ही महाराष्ट्रासाठी पहिलीच घटना होती. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांना राजीनामाही द्यावा लागला. या भारती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचीही चर्चा केली जात आहे. मात्र, भरतीसाठी जर उमेदवारांनी कोणाला पैसे दिले असतील तर ते परत मिळणार की बुडणार? यावरीलही चर्चेला उधाण आले आहे.  त्यामुळे सोमवारी भरतीबाबत काय चर्चा होणार ? त्यावर अनेक बाबी अवलंबून असणार आहेत.

शासनाकडे भरतीसाठी मुदतवाढ मागितली तरी त्यावर निर्णय घेण्यास सुमारे एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तसेच पूर्वी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्याच उमेदवारांना पुन्हा बोलवण्यास शासनाकडून परवानगी दिली जाणार की इतरही उमेदवारांचे अर्ज मागवावे लागणार ? विद्यापीठाकडून पुन्हा सिलेक्शन कमिटी बोलवणार की जुन्याच कमिटी मार्फत मुलाखती घेणार ? किंवा सर्व प्रक्रिया रद्द करून पुन्हा जाहिरात द्यावी लागणार ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील भरतीचा प्रश्न सहजपणे सुटणार नाही, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.