शिक्षक, पालकांचे वाढले काम ; विद्यार्थ्यांचा 'अपार आयडी'  तयार करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना 

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्र 'अपार आयडी' तयार करावा लागणार आहे.

शिक्षक, पालकांचे वाढले काम ; विद्यार्थ्यांचा 'अपार आयडी'  तयार करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Education Policy )अंमलबजावणीला सुरुवात झाली असून प्रत्येक विद्यार्थ्याचा 'वन नेशन वन स्टुडन्ट आयडी' असणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांच्या (parents) सांमतीने विद्यार्थ्यांचा (Automated Permanent Academic Account Registry (APAAR) ID  (अपार आयडी) तयार करावा, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Education) राज्य शासनाला प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा : शिक्षण डार्विन, आइनस्टाईन सिद्धांताला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्र 'अपार आयडी' तयार करावा लागणार आहे. येत्या १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत 'अपार आयडी' तयार करून घ्यावा, अशा सूचना राज्याचे केंद्रीय सचिव संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या  शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी शरद माकणे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना याबाबत पत्र पाठवले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आता जागतिक नागरिक म्हणून पाहायला जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा एक स्वतंत्र युनिक आयडी असणे गरजेचे आहे. त्यात परीक्षेचा निकाल, समग्र अहवाल कार्ड, ऑलंपियाड, विद्यार्थ्यांने इतर उपक्रमात केलेली कामगिरी, क्रीडा,  कौशल्य प्रशिक्षण आदी क्षेत्रात विद्यार्थ्याने मिळवळले यश आदी याविषयीची माहिती असणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरूनच पालकांच्या संमतीने 'अपार आयडी' तयार केला जाणार आहे. यातून जमा होणारी माहिती गोपनीय ठेवले जाणार आहे,असे केंद्रीय सचिव संजय कुमार यांच्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

दरम्यान, राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीच्या कामामुळे वैतागलेले असताना आता 'अपार आयडी' तयार करण्याचे काम सोपविण्यात जाऊ शकते. शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबवावीत या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यात आता जर अपार आयडी तयार करण्याचे काम शिक्षकांवर सोपवले गेले तर त्यावर शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया येतात. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.