शिक्षक भरती : ‘पवित्र’वर ५० टक्क्यांपेक्षा कमी नोंदणी, उरले फक्त पाच दिवस

राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केली जाणार आहे. नोंदणीसाठी २ लाख १६ हजार ४४३ जण पात्र असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

शिक्षक भरती : ‘पवित्र’वर ५० टक्क्यांपेक्षा कमी नोंदणी, उरले फक्त पाच दिवस
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) बहुप्रतिक्षित शिक्षक भरती (Teachers Recruitment) प्रकिया एक सप्टेंबरपासून सुरू केली आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या (Pavitra portal) माध्यमातून नोंदणी व स्व-प्रमाणपत्र भरले जात आहे. मात्र, मागील दहा दिवसांत केवळ लाखभर पात्र उमेदवारांनीच नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही लाखांहून अधिक उमेदवारांची नोंदणी झालेली नसून त्यासाठी केवळ पाचच दिवस उरले आहेत.

 

राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना https://mahateacherrecruitment.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी केल्याशिवाय भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. या नोंदणीसाठी २ लाख १६ हजार ४४३ जण पात्र असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

शिक्षक भरती : पवित्र पोर्टलवर असा भरा अर्ज, महत्वाचे दहा मुद्दे वाचा...

 

नोंदणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ ९० हजारांच्या जवळपास पात्र उमेदवारांचीच नोंदणी झाली आहे. पाच दिवसांत एक लाखांहून अधिक उमेदवारांना नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, त्यापैकी ५० ते ६० हजार उमेदवार नोंदणी करू शकता. अनेक उमेदवारांना खूप कमी गुण आहेत. त्यामुळे असे बहुतेक उमेदवार नोंदणी करणार नाहीत.

 

शिक्षक पात्रता परिक्षा २०१८ व २०१९ मधील जवळपास नऊ हजार जणांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यामुळे हे उमेदवारही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे पवित्र पोर्टलवर जवळपास दीड लाखांच्या आसपास उमेदवारांची नोंदणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातूनच गुणवत्ता यादीनुसार नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येणार आहे.

 

अशी होईल नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असतील. उमेदवारांची पात्रता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, गट  व विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार व गुणवत्तेनुसार नियुक्तीबाबतची शिफारस करण्यात येणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j