शिक्षक भरती महत्त्वाच्या टप्प्यावर, सध्या सुरु आहे 'ही' प्रक्रिया...

शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. 

शिक्षक भरती महत्त्वाच्या टप्प्यावर, सध्या सुरु आहे 'ही' प्रक्रिया...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही वर्षापासून चर्चेत राहिलेली शिक्षक भरती (Teacher Recruitment) आता महत्त्वाच्या टप्प्यावर (At a critical juncture) पोहोचली आहे. अभियोग्यताचा चाचणी (Aptitude Test) पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र (appointment letter) देण्यासंदर्भात संस्था/जिल्हा परिषदेत याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दिली. 

यामध्ये अभियोग्यता धारकांमधील काही खोडसाळ व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. यातून फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे. 

सर्वांना सुचित करण्यात येते की ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास वाव नाही.  त्यामुळे अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. 

----------------------------------

अमुक जिल्हा परिषद मध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो वगैरे वगैरे प्रकारे खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर तातडीने ती बाब प्रशासनाचे अथवा नजीकचे पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून द्यावी .

- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त , महाराष्ट्र राज्य