मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला मिळते चालना : चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला मिळते चालना : चंद्रकांत पाटील
Higher Education Minister Chandrakant patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन शैक्षणिक धोरणात (NEP 2020) मातृभाषेतून शिक्षण देण्याला महत्व देण्यात आले आहे. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी (Engineering) विषयाची पुस्तके लवकरच मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मातृभाषेतून (Mother Tongue) शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला आणि सृजनशीलतेला चालना मिळते. संशोधनाला चालना मिळून बौद्धिक संपदा हक्क अधिक प्रमाणात मिळविता येतात, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.  

मुक्तांगण इंग्रजी विद्यालयात पुणे विद्यार्थी गृह (Pune Vidyarthi Griha) आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या वतीने 'उच्च शिक्षणाच्या खाजगी संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात व्यवस्थापनाची भूमिका' या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुनील रेडकर आदी उपस्थित होते. 

SPPU News : पदवी प्रदान समारंभ १ जुलैला; सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र

पाटील म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. या धोरणात रोजगाराभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. शैक्षणिक संस्थांनी परिसरातील उद्योगांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार नव्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव सादर करावेत, त्यास त्वरित मान्यता देण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात देशाच्या गतवैभवाच्या समावेशावरही भर देण्यात आला आहे. आपल्या परंपरेचा अभिमान विद्यार्थ्यांना वाटेल असे आणि नीतिमत्तेचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल.

तंत्रशिक्षण मंडळाद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगात काम करून त्याच ठिकाणी तंत्रनिकेतनच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पारंपरिक शिक्षणासोबत कला विषयाचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

‘या’ खासगी विद्यापीठांच्या शुल्कात मिळेल ५० टक्के सवलत; पुण्यात सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी

सीताराम म्हणाले, संशोधन, उद्योजकता विकास, कौशल्य विकास, भारतीय मूल्यविचार हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा गाभा आहे. हे धोरण निरंतर चालणाऱ्या अध्ययन प्रक्रियेवर आधारित आहे. शिक्षण सर्वसमावेशक करण्याचा, शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. ८४ संस्थांमध्ये प्रादेशिक भाषेतील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची किंवा इच्छेनुसार नवा अभ्यासक्रम निवडण्याची सुविधा असणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo