तलाठी भरती : बंदचा विद्यार्थ्यांना फटका, परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात अडचणी

राज्यभरात अनेक ठिकाणी बंदमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना विलंब झाल्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला गेला नसल्याच्याही तक्रारी आहेत.

तलाठी भरती : बंदचा विद्यार्थ्यांना फटका, परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात अडचणी
Talathi Bharti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर (Maratha Reservation) पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ राज्यात (Maharashtra) सोमवारी अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बसही (MSRTC) बंद ठेवण्यात आल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. त्यातच आज तलाठी भरतीची (Talathi Bharti) परीक्षाही असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचण्यास विलंब होत आहे. एक मिनिट उशीर झाला तरी त्यांना परीक्षा केंद्राबाहेर ठेवले जात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

 

राज्यभरात अनेक ठिकाणी बंदमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना विलंब झाल्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला गेला नसल्याच्याही तक्रारी आहेत. काही जणांनी याबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसह विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांच्या अनेकांनी परीक्षा पुढे ढकल्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडे ही मागणी अमान्य करण्यात आली.

पद एकच पात्रता वेगळी; आरोग्य सेवक पदभरतीबाबत उमेदवारांमध्ये नाराजी

तलाठी भरतीसाठी अनेक विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यामुळे बहुतेक जण एसटीचा वापर करतात. परंतु, शनिवार-रविवारसह सोमवारीही अनेक भागात एसटी सेवा विस्कळित झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहण्यात अडचणी येत आहेत. याबाबत रोहित पवार यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

 

पवार यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्ह राज्यात अनेक ठिकाणी बंदची हाक दिली असल्याने बससेवा बऱ्याच भागात बंद आहे. त्यामुळे सरळसेवा तलाठी परिक्षेच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी पोहचले आहेत तर काही पोहचू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. राज्य सरकारने याविषयी त्वरित दखल घेऊन काय मार्ग काढता येईल, याचा विचार करायला हवा.

 

जे परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहचतील त्यांची परीक्षा घ्यावी व जे पोहचू शकणार नाहीत त्यांची परीक्षा नंतर घ्यावी. तसेच एक मिनिट लेट झाले तरी परीक्षार्थीना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. यासंदर्भात देखील सक्ती न करता ५ ते १० मिनिटे परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.  विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की केवळ बघ्याची भूमिका न घेता त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j