तलाठी भरती : ऑनलाईन अर्जात दुरुस्ती करण्याची संधी नाहीच, शासनाकडून स्पष्टीकरण

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि. २६ जून रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तलाठी भरती : ऑनलाईन अर्जात दुरुस्ती करण्याची संधी नाहीच, शासनाकडून स्पष्टीकरण
Talathi Recruitment 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या महसूल विभागातर्फे (Department of Revenue ) तलाठी भरतीची (Talathi Recruitment ) प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज (Online Application) भरून घेतले जात आहेत. मात्र, या प्रक्रियेत अर्ज व शुल्क भरून अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतीही दुरुस्ती करता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे दुरुस्तीची संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. ही मागणी राज्य शासनाने (Maharashtra Government) नाकारली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि. २६ जून रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. पण आता विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींमुळे ही प्रक्रिया वादात अडकण्याची चिन्हे आहे. ऑनलाईन अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा नसल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

तलाठी भरती : अर्जात दुरुस्तीची संधी नाकारली ; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती

याविषयी अप्पर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जाहिरातीमध्ये तलाठी पदाकरीता आवश्यक अर्हता, आवश्यक कागदपत्रे अर्ज सादर करण्याची पद्धत, इत्यादीबाबत सविस्तर सूचना नमुद केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अर्जदारास नोंदणी (Registration) प्रक्रियेवेळी तसेच प्रत्यक्ष अर्ज भरुन झाल्यानंतर सादर (Submit) करण्यापुर्वी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत खात्री करण्याकामी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सूचना व्यवस्थितपणे वाचून समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपूर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जदाराने शुल्क भरून अर्ज सादर (Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे, असे रायते यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शुल्क भरून अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD